तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२७४२

अभक्ताचे गावी साधु म्हणजे काय ।व्याघ्रवाडा गाय सापडली ? ।।१।।

कसाबाचे आळी मांडीले प्रमाण ।बस्वण्णाची आण तया काई ?।।२।।

मोतीयाची गोणी माळे वोळी नेली ।पुसती केवढ्या केली पासरी हो ?।।३।।

केळी आणि बोरी वसती शेजारी ।संवाद कोणे परी घडे तेथे ? ।।४।।

तुका म्हणे खीर केली कार्र्हेळ्याची ।शुद्ध गोडी कैची वसे तेथे ? ।।५।।

भावार्थ-

अभक्तांच्या गावात साधु म्हणजे काय हे कुणालाच माहित नसते. वाघ ज्या वाड्यात राहतो तेथे गाय कुणाला तरी सापडेल का ? ।।१।।मुर्खांच्या बैठकीत उपनिषदांचा सिद्धांत मांडला असता कुणाला तरी त्याचे महत्त्व कळेल का ? वेदांच्या शपथेची त्यांना भीडभाड नसते. ।।२।।मोत्यांनी भरलेली गोणी माळ्याने फुलबाजारात नेली तर हे काय भावाने तोलून देणार असे गाजरपारखी लोक विचारतात. ।।३।।गोड केळी आणि आंबट बोर यांची झाडे शेजारी शेजारीच वाढतात पण त्यांच्यात कोणत्या प्रकारचा संवाद घडून येतो बरे ? ।।४।।तुकोबा म्हणतात, अहो,कारल्याची अगदी खीरही केली तरी तिला गोडी कशी येईल ? ।।५।।


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!