तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.१८५८

देवाचिये घरी देवे केली चोरी ।

देवें देव नागवूनि केला भिकारी ।।१।।

धावणिया धावा धावणिया धावा ।

मागचि नाही जाणे कवणिया गावा ।।२।।

सवेंचि होता चोर घरचिया घरी ।

अवघे केले वाटोळे फांवलियावरी ।।३।।

तुका म्हणे येथे कोणीच नाही ।

नागवले कोण गेले कोणाचे काई ।।४।।

भावार्थ-

देवाच्या घरात देवानेच चोरी केली आणि देवानेच देवाला नागवून भिकारी केले. ।।१।।चोरी झाल्यामुळे प्रचंड धावपळ झाली. सगळीकडे धावाधाव झाली. परंतु कोणत्या गावी जाऊन चोराचा शोध घ्यावा हे कुणालाच कळेना. कारण त्या चोराचा काहीच पत्ता लागत नव्हता. ।।२।।खरे पाहता चोर हा घरातलाच होता आणि तो सतत सोबत होता. अशा ह्या घरातील चोराने संधी मिळताच सारे काही वाटोळे करुन टाकले. ।।३।।तुकोबा म्हणतात, येथे देवाशिवाय दुसरा आहेच कोण ? त्यामुळे स्वतःच्याच घरात चोरी केल्याने येथे कोण नागवला आणि कोणाचे काय गेले ? ।।४।।


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!