तृष्णा हेच बन्धन आहे व वैराग्य-पूर्वक तृष्णा-त्याग हीच मुक्ति आहे. भाग -१०. ८

तृष्णा हेच बन्धन आहे व वैराग्य-पूर्वक तृष्णा-त्याग हीच मुक्ति आहे.
भाग -१०. ८

राज्यं सुताः कलत्राणि शरीराणि सुखानि च ।
संसक्तस्यापि नष्टानि तव जन्मनि जन्मनि ॥
अनुवाद – ज्या मुला मुलींची, शरीराची, सुखाची व राज्याची तुला आसक्ति होती ते सर्व तर प्रत्येक जन्मात नष्ट झाले आहे. ( तुझ्या प्रत्येक जन्मात तुला मोह असलेली सुखे प्रत्येक जन्मात नष्ट झाली आहेत.)

विवेचन – मनुष्याचा जन्म होतो, तो मोठा होतो, शिकतो, नोकरी करतो, पैसा कमावतो, विवाह करतो, मुलांना जन्म देतो, घर-गृहस्थी व संसाराच्या जबाबदार्‍या पार पाडतो. या सर्व कार्याशी त्याची आसक्ति व मोह जोडलेला असतो कारण या सर्व गोष्टी ( मुले, घर वगैर) तो त्याच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत असे मानत असतो. या सर्व बाबींपासून त्याच्या अनेक अपेक्षा असतात. त्याच्या सुखाच्या कल्पना त्याच्याशी जोडलेल्या असतात. परंतु ज्या या बाबींशी तो एवढा जोडलेला असतो त्या सर्व बाबी त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यापासून दूर होतात, नष्ट होतात. हे असे प्रत्येक जन्मात सुरू आहे. कायमचे असे त्याच्याजवळ काहीच टिकत नाही.

पुन्हा नविन जन्म व पुन्हा नवीन जन्मात सर्व गोष्टी तो नव्याने करतो. परंतु अज्ञानामुळे तो हे समजू शकत नाही की या गोष्टींच्या आसक्तिचा त्याग करणे हेच ज्ञान आहे. मुनीश्रेष्ठ अष्टवक्र राजा जनकाला हाच उपदेश करीत आहेत की, तुझे अनेक जन्म झाले; प्रत्येक जन्मात तुला मुले, शरीर, राज्य व अन्य सुखे प्राप्त झालीत. या सर्वांबद्दल तुला आसक्ति असूनसुद्धा ते सारे नष्ट झाले. हे सर्वथा कायमस्वरूपी तुझे झालेच नाही म्हणून तुझी आसक्ति निरर्थक आहे. या आसक्तिमुळेच तुला वारंवार जन्म घ्यावा लागतो. या आसक्तिमुळेच त्यांच्यापासून दूर होण्याच्या विचाराने मन दुःखी होते अन्यथा या आसक्तिशिवाय दुखः होण्याचे दुसरे कोणतेच कारण नाही. म्हणून या पूर्वजन्माच्या अनुभवापासून तू बोध प्राप्त कर. आता तू या आसक्तिच्या त्याग कर जिच्यामुळे तुला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची वेळ येते व पुन्हा पुन्हा दुःख भोगावे लागते तिच्यापासून मुक्त होण्यासाठी तिचा त्याग कर.

अलमर्थेन कामेन सुकृतेनापि कर्मणा ।
एभ्यः संसारकान्तारे न विश्रान्तमभून्मनः ॥
अनुवाद – धनसंपत्ती (अर्थ), काम (इच्छा व आकांक्षा) आणि सत् कृत्ये (सुकृत) पुष्कळ झालीत. तरीसुद्धा ह्या संसाररूपी जंगलात मनाला शांतता व स्वस्थता लाभली नाही.

विवेचन – अष्टवक्र स्वामी, राजा जनकाला पुन्हा उपदेश करतात की धनसंपत्ती पुष्कळ कमावली, कामप्रेरीत कार्ये पुष्कळ झालीत आणि अनेक चांगली कामेसुद्धा केलीत व अजूनही हेच सर्व करणे सुरू आहे तरीसुद्धा या संसाराच्या जंगलात तू अतृप्त राहून भटकतो आहेस, तुला विश्रांती मिळत नाही. जर ह्या वस्तूत व कृत्यात सुख असते जर या वस्तूंमुळे आनंद मिळत असता तर तुला त्यांचेपासून सुखसमाधान प्राप्त झाले असते. जर या कामांमुळे तुझ्या दुःखांचा नाश झाला असता तर त्यांच्यापासून तुला नक्कीच शान्ति व आनंद प्राप्त झाला असता. पण तसे झाले नाही कारण त्यांच्यापासून सुख मिळू शकत नाही. तू सम झाल्याने सुखाच्या अपेक्षेने ह्या वस्तू व कृत्ये यांना उराशी कवटाळत आलास. आता या भ्रमाचा व अज्ञानाचा त्याग कर !

कृतं न कति जन्मानि कायेन मनसा गिरा ।
दुःखमायासदं कर्म तदद्याप्युपरम्यताम् ॥
अनुवाद – शरीराने, मनाने व वाणीने तू काय अनेक जन्म दुखदायी व कष्टदायी कामे केली नाहीस ? आता तरी विश्रांती घे.

विवेचन – अष्टवक्र स्वामी जनकाला उपदेश करतात की वरपांगी सुखदायी वाटणारी ही कामे तू अनेक जन्मात केली आहेस. त्यामुळे सुख प्राप्तीच्या ऐवजी दुःख व कष्टच निर्माण झालेत व तू थकून गेलास. कारण तुझी या सर्व कामाबद्दल व माणसे, वस्तू यांचेबद्दल जी आसक्ति आहे ती तुझ्याकडून ही दुःखाला कारणीभूत होणारी कामे करून घेते व या कष्टांमुळे तू थकून गेलास. कारण जन्म-मृत्यूचे तुझे फेरे या आसक्तिमुळे सतत सुरू आहेत. आता तुला खरे सुख व मानसिक शांतता हवी असेल तर आता तरी तिचा त्याग कर.

॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.

ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!