नको साधनेचा अतिरेक, ठेवा जागृत विवेक. भाग-२

योगसाधना ‘करायची’ आहे असा आपला मनोग्रह असतो. त्याचप्रमाणे आता भगवंतप्राप्ती होईपर्यंत दैनंदीन जीवनाचा रस उपभोगायचा नाही असे आपण सुनिश्चित करतो. ही गोष्ट विशेषतः योगमार्ग आपला म्हणणाऱ्यांमध्ये जास्त आढळून येते. भक्‍तिमार्गात हा दुराग्रह नसतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की भक्तांमध्ये कुठलाच दुराग्रह नसतो. नेहमीच्या जीवनातील रसाकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांचा स्वभाव दिसून येत नाही एवढेच म्हणायचे आहे. साधनेच्या अतिरेकी मार्गांना कवटाळणारे बहुतांशी स्वतःला योगसाधकच म्हणवितात. म्हणून योगमार्ग सांगून झाल्यावर भगवंत अर्जुनाला सावध करीत आहेत. अतिरेकीपणा टाळा असे बाकी कुठल्याही अध्यायांत उघडपणे सांगितलेले नाही याचे कारण योगमार्गात टोकाला जाण्याच्या प्रवृत्तीला प्राधान्य देण्याचा धोका जास्त असतो.

त्येकामध्ये योगसाधना करण्याची क्षमता आहे यात शंका नाही पण म्हणून घाईगडबडीने आपल्या योग्यतेचे फळामध्ये परिवर्तन करण्याच्या मोहात आपण कधीही पडू नये. योग्यवेळी सर्वकाही आपोआप होणार आहे या विश्वासावर आपण आपले दैनंदिन आयुष्य नियमित करुन भगवान श्रीशंकरांप्रमाणे ज्ञानाच्या गंगेच्या स्त्रोत पेलण्याचे सामर्थ्य जागृत केले पाहिजे असे भगवान म्हणत आहेत. कुणाला अचानक भरपूर पैका मिळाला तर त्याची नियत बदलण्याचीच शक्यता जास्त असते त्याचप्रमाणे परमार्थात अतिशय लवकर प्रगती करणाऱ्यांमध्ये दुराग्रह आढळण्याचीच शक्यता असते आणि त्यातून सहिष्णुतेचा अभाव दिसून येतो. त्याचप्रमाणे योगमार्गावर पदार्पण केल्यावर टोकाची साधना करुन लगेच भगवंताशी मिलन होईल ही आपली भावना आपण मनातून काढून टाकायला हवी. वाट बघण्यामध्ये आपल्यातील योग्यता कमी होत नाही तर ज्ञान प्रगट होण्याकरीता जी परिपक्वता लागते तीची आवश्यकता स्पष्ट होते.

साधनेच्या मार्गांतील अतिरेकीपणाचा अजून एक फार मोठा तोटा आहे. तो म्हणजे आपला या प्रयत्‍नांमुळेच आपणास ज्ञानप्राप्ती झाली असे मानण्याचा स्वभाव होणे. आपल्या मनाच्या या अवस्थेमुळे साधनेला आपल्या जीवनात अतिशय मानाचे स्थान निर्माण होते कारण ज्या प्रक्रियेमुळे भगवंत मिळणार आहे तीच्याबद्दल कुणाच्या मनात आत्मीयता उत्पन्न होणार नाही? एकदा एका गोष्टीला प्राधान्य प्राप्त झाले की तीच्या तुलनेने बाकीच्या गोष्टी कमी महत्वाच्या होतात आणि आपोआप आपल्या जीवनात एक साचेबध्दपणा निर्माण व्हायला लागतो. कमी महत्वाच्या गोष्टी करताना मनात कंटाळा यायला लागतो.

केव्हा एकदा साधना करायला मिळेल अशी भावना निर्माण होते. आणि सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे आपण असा विचार करण्यामध्येच धन्यता मानू लागतो. जरा बघा, एखादी गोष्ट आपल्या जीवनात महत्वाची झाली की आपला दृष्टीकोन कसा बदलतो ते. आता तुम्ही असे म्हणाल की मी जी गोष्ट महत्वाची ठरविलेली आहे ती खरोखर महत्वाची आहे, बाकी व्यावहारिक माणसांप्रमाणे मी पैसा, घर, बायको-मुले इत्यादी मह्त्वाचे न ठरविता स्वतःची साधना महत्वाची ठरविलेली आहे. परंतु आपण कुठली गोष्ट महत्वाची ठरविलेली आहे याला महत्व नाही. जीवनामधील नैसर्गिकता नष्ट झाली आहे या वस्तुस्थितीला महत्व आहे. स्वतःच्या डोळ्यांवर चष्मा चढला आहे हे बघणे जरुरी आहे.

इथे काहीजण अशी कुशंका काढतील की म्हणजे स्वैर जीवन जगण्यामध्येच धन्यता मानावी का? याचे उत्तर असे की स्वैर जगण्याचा आनंद उपभोगण्याची इच्छासुध्दा त्या स्थितीला महत्व देण्याचीच आहे. मग करायला काय हवे? तर लहान मूल जसे शरीराच्या नैसर्गिक गरजा भागल्यावर जे समोर येईल त्याचा स्वीकार करण्यास तयार असते तसे आपण जीवनात सदैव तयार रहायला हवे.

आपल्या जीवनात काहीही घडले तरी ते योग्यच आहे असे आपण माउलींवरील विश्वासाने म्हणायला हवे. तसे आपण म्हणू शकत नाही कारण आपल्या मनाचा नैसर्गिक लवचिकपणाला आपण नष्ट केले आहे. योगसाधनेच्या अभ्यासाचे मर्म भगवंतांनी वरील ओव्यांमध्ये उकलून दाखविले आहे. कुठल्याही अपेक्षेला मनात थारा न देता जो सतत सत्यदर्शनाच्या उत्सुकतेची ज्योत आपल्या मनात निरंतर जागृत ठेवतो त्याच्या जीवनात आपोआप आमुलाग्र बदल होतो.

त्याची जीवनशैली अगदी सहजपणे प्रारब्धानुसार समोर आलेली कर्मे यथाशक्‍ती पार पाडताना सतत भगवंताचे अनुसंधान मनात ठेवणे अशी होते. शरीराने एखादे कर्म (सकाळची साधना वा माध्यान्हीचे ग्रंथवाचन वा सायंकाळची प्रार्थना इत्यादी) दररोज केलेच पाहिजे हा बाळबोध आग्रह त्याच्या मनातून नष्ट होतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्या हातून गुरुपोनिर्दिष्ट साधना घडू लागते आणि जीवनातील सर्व गोष्टींमधील मधुरता त्याला दिसू लागते. स्वतःचा झालेला मान आणि अपमान तो एकाच दृष्टीने पाहू शकतो आणि त्याच्या जीवनात आपोआप भगवंताचे आगमन होते.

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात
‘जैसे भाग्याचिये भडसें । उद्यमाचेनि मिषे । मग समृध्दीजात आपैसें । घर रिघे ॥ज्ञानेश्वरी ॥
तैसा युक्तिमंत कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिध्दीचि पिके । अनुभव तयाचा ॥ ज्ञानेश्वरी ॥’
याचा अर्थ असा की ‘एकदा मनातील भगवंताचे अनुसंधान व्यावहारिक विवंचनांमुळे भंगणे बंद झाले की ज्याप्रमाणे नशीब चांगले असताना हातून कार्य घडले की आपोआप समृध्दी मिळते तसे आत्मज्ञान प्राप्त होते. मग बसल्या ठिकाणी ध्यान लागून सहजसमाधी अवस्था प्राप्त होते.’ स्वामी स्वरुपानंद अशा अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात ‘सहजसमाधी सापडले धन, लांचाविले मन तया ठायी.’ खरे म्हणजे जेव्हा आपले मन प्रसन्न असते तेव्हा आपण याच अवस्थेत असतो परंतु आपल्या जीवनातील काम आणि क्रोध यांचे निराकरण झालेले नसल्याने त्या अवस्थेला निर्वात ठीकाणच्या दीपज्योतीसारखी स्थिरता नाही. योगसाधनेमुळे आपणास जगावेगळे ज्ञान मिळणार नाही, तर झालेल्या ज्ञानाला सतत सहन करण्याची ताकद अंगात येईल. भगवंत आपल्यामध्ये आहे या जाणीवेवर सत्यतेचे शिक्कामोर्तब होईल.

॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.

ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!