॥ ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ ॥
। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावा।
🚩 । आत्मसंयमयोग: । 🚩
ओवी क्र. :- ३९१ ते ४००
भगवद् गीता श्लोक :- ०३
❣ 卐 श्रीज्ञानेश्वरी प्रारंभ 卐❣
सर्वभूस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९ ॥
भावार्थ :- योगाभ्यासने ज्याचे चित्त पूर्ण शुद्ध आणि स्थिर झालेले आहे, ज्याची दृष्टी समरूप झालेली आहे, असा योगी आत्मा हा सर्व भूतमात्रांचे ठिकाणी स्थित आणि सर्व भूतमात्र आत्म्याच्या ठिकाणी स्थिर आहेत, असे पाहतो….
—–卐
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ३० ॥
भावार्थ :- जो मला सर्वत्र समप्रमाणात पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व सर्व पाहतो, त्याला मी कधी दृष्टीआड होत नाही व तो मला कधी दृष्टीआड होत नाही…
—–卐
तरी मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं ।
आणि तैसेंति माझ्या ठायीं । सकळ असे ॥ ३९१ ॥
मी सर्वांच्या देहात आहे, (यात विचार करण्यासारखे काही नाही ) यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे , माझ्या ठिकाणी हे सर्व आहे..
हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें ।
बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥ ३९२ ॥
हे असेच बनलेले आहे आणि परस्परात मिसळलेले आहे. परंतु साधकाने आपल्या बुद्धीचा दृढनिश्चय करावा…
एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना ।
सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥ ३९३ ॥
अर्जुना ! एरव्ही तरी जो पुरुष ऐक्य भावनेने सर्व भूतमात्रात सम प्रमाणात असलेल्या मला जाणून भजतो,
भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें ।
केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो ॥ ३९४ ॥
भूतमात्राच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे एकत्त्वच जाणतो,
मग तो एक हा मियां । बोलता दिसतसे वायां ।
एऱ्हवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहें ॥ ३९५ ॥
हे अर्जुना ! मग तो माझ्याशी एकरूप आहे, हे बोलणे देखील व्यर्थ आहे. कारण, असे जरी बोलले नाही, तरी तो मीच आहे ..
दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा ।
तो माझ्या ठायी तैसा । मी तयामाजीं ॥ ३९६ ॥
दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये जशी एकाच प्रकारची योग्यता आहे, त्याप्रमाणे तो माझे ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्य भावनेने आहोत….
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि माने अवकाशु ।
तैसा माझेनि रुपें रुपसु । पुरुष तो गा ॥ ३९७ ॥
ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाने रसाला अस्तित्व असते अथवा आकाशाच्या अस्तित्वाने पोकळीचे अस्तित्व असते, त्याप्रमाणे योगी पुरुष सच्छीदानंदरूपाने सच्छीदानंदरूप झालेला असतो..
—–卐
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१ ॥
भावार्थ ;- जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व भूतमात्रांचे ठिकाणी आत्मरूपणे असलेला जो सच्छीदानंदघन अशा मला ज्ञानभक्तीने जाणतो, तो सर्व प्रकारे वर्तत असला , तरी माझ्या ठिकाणीच राहतो…
—–卐
जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी ।
देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥ ३९८ ॥
अर्जुना ! ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एक सुतच असते, त्याप्रमाणे ज्याने ऐक्याच्या भावाने सर्वत्र मलाच पहिले आहे,
कां स्वरुपें तरी बहुतें आहाती । परि तैसी सोनीं बहुवें न होती ।
ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥ ३९९ ॥
ज्याप्रमाणे अलंकाराचे आकार जरी पुष्कळ असले, तरी सोने हे एकच असते, त्याप्रमाणे विभिन्न आकार असले, तरी अचल पर्वताप्रमाणे ज्याची ऐक्य स्थिती असते…
ना तरी वृक्षांचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं ।
ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥ ४०० ॥
अथवा, वृक्षाची जितकी पाने असतात, तितकी रोपे लावलेली नसतात, त्याप्रमानने अद्वैताच्या दिवसाने द्वैताची रात्र संपून ज्याला उजाडलेले असते,