ऐसी मनबुद्धिकरणीं ।सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी ।तेथ जन्में जोडलिये वाहणी ।युगचि बुडे ॥ २३१।।
अशा प्रकारे बुद्धि व इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो, त्या वेळेस जन्मभर मिळविलेले सर्व लाभ नाश पावतात.
हां गा हातींचें जे वेळीं जाये ।ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे ।म्हणऊनि प्रयाणीं तंव होये ।येतुली दशा ॥ २३२॥
हे पहा, हातचे गेल्यावर मग पुनः लाभ होण्याची गोष्ट कशाला पाहिजे ? म्हणून मरणसमयी अशी दशा प्राप्त होते.
ऐसी देहाआंतु स्थिति ।बाहेरि कृष्णपक्षु वरि राती ।आणि सा मासही वोडवती ।दक्षिणायन ॥ २३३॥
याप्रमाणे देहांतील आंतली स्थिती असून बाहेर कृष्णपक्षाचा पंधरवडा असतो, व त्यांत रात्र आणि दक्षिणायनांतील सहा महिन्यांपैकी एक महिना हीं प्राप्त होतात.
इये पुनरावृतीचीं घराणीं ।आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं ।तो स्वरूपसिद्धीची काहाणी ।कैसेनि आइके ॥ २३४॥
हे सर्व जन्ममरणाच्या फेऱ्यांत पाडणारे योग ज्यांच्या मरणसमयी एके ठिकाणी येतात, त्यांच्या कानी मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार ?
ऐसा जयाचा देह पडे ।तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे ।मग तेथूनि मागुता बहुडे ।संसारा ये ॥ २३५ ॥
अशा वेळेवर ज्यांचे देहावसान होते, त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जाता येते. मग तेथुन परतून तो फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यांत पडतो.
आम्हीं अकाळ जो पांडवा ।म्हणितला तो हा जाणावा ।आणि हाचि धूम्रमार्ग गांवा ।पुनरावृत्तीचिया ॥ २३६॥
हे पांडवा, आम्ही मरणास अयोग्य काळ म्हणून जो म्हटला, तो हाच असे समज, जन्ममरणाच्या गांवास नेणारा 【धूम्रमार्ग हाच तो】
येर तो अर्चिरादि मार्गु ।तो वसता आणि असलगु ।साविया स्वस्थु चांगु ।निवृतीवरी ॥ २३७॥
याच्याशिवीय दुसरा जो अर्चिरादि मार्ग, तो भरवस्तीचा, सोपा, अति उत्तम व अगदीं सुलभ असून मोक्षापर्यत गेलेला आहे.
ऐसिया अनादि या दोन्ही वाटा ।एकी उजू एकी अव्हांटा ।म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा ।दाविलिया तुज ॥ २३८॥
असे हे दोन मार्ग -एक सरळ आणि दुसरा वाकडा – अनादि कालापासून चालत आलेले आहेत. म्हणून, हे महावीरा, ते तुला बुद्धिपुरस्सर दाखविले.
कां जे मार्गामार्ग देखावे ।साच लटिकें वोळखावें ।हिताहित जाणावें ।हिताचिलागीं ॥ २३९।।
कां की, त्या मार्गापैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे ; आणि खरे खोटे ओळखून , आपले हित साधून घेण्याकरिता 【 त्वां 】 हित व अहित यांचाही विचार करावा.
पाहे पां नाव देखतां बरवी ।कोणी आड घाली काय अथावीं ।कां सुपंथ जाणोनियां अडवीं ।रिगवत असे ।।२४०॥
हे पहा, उत्तम अशी नाव पाहिल्यावरही अथांग डोहांत कोणी उडी घालील काय ? किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय??