सार्थ ज्ञानेश्वरी – ||अध्याय ८ वा अक्षरब्रह्मयोग: – ओवी १९१ ते २००

ऐसें जाणूनि योगीश्वर ।जयातें म्हणती परात्पर ।जें अनन्यगतीचें घर ।गिंवसीत ये ॥ १९१॥
असे जाणूनच योगिजन त्याला परात्पर म्हणतात. तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो.
जे तनू वाचा चित्ते ।नाइकती दुजिये गोष्टीतें ।तयां एकनिष्ठेचें पिकतें ।सुक्षेत्र जें ॥ १९२।।
जो एकनिष्ठ भक्त कायावाचामनेकरून दुसरे काही जाणत नाही, त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत होय…
हें त्रैलोक्यचि पुरूषोत्तम ।ऐसा साच जयाचा मनोधर्मु ।तया आस्तिकाचा आश्रमु ।पांडवा गा ॥ १९३॥
हे पांडवा, हे त्रैलोक्य भगवद्रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव आहे, त्या भक्ताचा हा आश्रमच होय.
जें निगर्वाचें गौरव ।जें निर्गुणाची जाणीव ।जें सुखाची राणीव ।निराशांसी ॥ १९४॥
जे निरभिमान्यांचे वैभव, जे गुणातीतांचे ज्ञान, व जे निस्पृहाचे सुखोपभोग घेण्याचे स्थान 【 राज्य स्थान】
जें संतोषियां वाढिलें ताट ।जें अचिंता अनाथाचें मायपोट ।भक्ती उजू वाट ।जया गांवा ॥ १९५॥
जे संतोषी जनाचें जेवण, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचे मायपोट व जे भक्तीने चालणाराला मोक्षरूपी गांवाची सरळ वाट.
हें एकैक सांगोनि वायां ।काय फार करूं धनंजया ।पैं गेलिया जया ठाया ।तो ठावोचि होइजे ॥ १९६॥
हे…धनंजया, असे एकेक सांगून उगीच किती वर्णन करूं ? परंतू ज्या ठिकाणी गेलें असता मनुष्य तद्रूपतेला पावतो.
हिंवाचिया झुळुका ।जैसें हिंवचि पडे उष्णोदका ।कां समोर हालिया अर्का ।तमचि प्रकाशु ॥ १९७॥
थंडीच्या झुळकेने जसे ऊन पाणी थंड होते, किंवा सूर्य समोर आल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो..
तैसा संसारू जया गांवा ।गेला सांता पांडवा ।होऊनि ठाके आघवा ।मोक्षाचाचि ॥ १९८॥
त्याप्रमाणे पांडवा, अज्ञान व त्याचें कार्य जग ज्या गांवाला गेले असतां आपणच मोक्ष होऊन रहाते..
तरी अग्नीमाजीं आलें ।जैसें इंधनचि अग्नि जहालें | पाठीं न निवडेचि कांही केलें ।काष्ठपण ॥ १९९॥
तसेच इंधन विस्तवात घातले असतां विस्तवच होऊन राहते, व मागून निवडूं गेले असतां त्याचे लाकुडपण दृष्टीस पडत नाही..!
ना तरी साखरेचा माघौता ।
बुध्दिमंतपणेंही करितां ।परि ऊंस नव्हे पांडुसुता ।जियापरी।।२००॥
किंवा, पंडुसुता, ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुनःचातुर्यानें तिचा ऊंस करता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!