सार्थ ज्ञानेश्वरी – ||अध्याय ८ वा अक्षरब्रह्मयोग: – ओवी १८१ ते १९०

म्हणोनि अक्षर जें म्हणिजे ।तेवीचि म्हणतां बोधुही उपजे ।जयापरौता पैसु न देखिजे ।या नाम परमगति ॥ १८१॥
म्हणून ज्याला ‘ अक्षर’ म्हणतात, त्याचा अक्षर म्हणण्यांतच बोध उत्पन्न होतो. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही..
परि आघवा इहीं देहपुरीं ।आहे निजेलियाचे परी ।जे व्यापारू करवी ना करी ।म्हणऊनियां ॥ १८२॥
आणि याचेच नाव परमगति. परंतु तें या शरीरांत व्यापून राहीलेले असुन निजल्याप्रमाणे आहे. कां की, ते व्यापार करवीत नाही व करीतही नाही.
एऱ्हवीं जे शारीरचेष्टा ।त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा ।दाही इंद्रियांचिया वाटा ।वाहतचि आहाति ॥१८३॥
हे महावीरा अर्जुना , येरव्ही शरीराच्या सर्व व्यापारांत एकही व्यापार रहात नाही ; दहाही इंद्रियांचे व्यापार चालूच आहेत…
उकलूं विषयांचा पेटा ।होता मनाचां चोहटा ।तो सुखदुःखाचा राजवांटा ।भीतराहि पावे ॥ १८४॥
विषयरूप बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरूं झाल्यावर, त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांचा मुख्य हिस्सा अंतर्यामीही प्राप्त होतो.
परि रावो पहुडलिया सुखें ।जैसा देशींचा व्यापारू न ठके ।प्रजा आपुलालेनि अभिलाखें ।करितचि असती ॥ १८५॥
परंतु राजा सुखानें निजला असतां ज्याप्रमाणे त्याच्या राज्यांतील व्यापार रहात नाहीत, प्रजा आपापल्या ( प्राप्तीच्या ) इच्छेनें व्यापार करीतच असते..
तैसें बुद्धीचें हन जाणणें ।कां मनाचें घेणेंदेणें ।इंद्रियांचें करणें ।स्फुरण वायूचें ॥ १८६॥
त्याप्रमाणे, बुद्धिचे जाणणे किंवा मनाचे देणेघेणे, इंद्रियांचे करणे, व प्राणवायूंचे स्फुरण पावणे हे सर्व त्यात समावेशिक आहे..
हे देहक्रिया आघवी ।न करितां होय बरवी ।जैसा न चलवितेनि रवी ।लोकु चाले ॥ १८७॥
सर्व देहव्यापार त्याने न करवितां आपोआपच होतात , ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता लोकत्रय चालते..
अर्जुना तयापरी ।सुतला ऐसा आहे शरीरीं ।म्हणोनि पुरूषु गा अवधारीं ।म्हणिपे जयातें ॥ १८८॥
त्याप्रमाणे, अर्जुना, तो शरीरांत स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात असें तु..समज…
आणि प्रकृति पतिव्रते ।पडिला एकपत्नीव्रतें ।येणेंही कारणें जयातें ।पुरूषु म्हणों ये ॥ १८९॥
आणि मायारूप पतिव्रतेच्या एकपत्नीव्रतांत पडल्यामुळे हा पुरुष हे नांव पावला आहे.
पैं वेदाचें बहुवसपण ।देखेचिना जयाचें आंगण ।हें गगनाचें पांघरूण ।होय देखा ॥ १९०॥
परंतु वेदाच्या ज्ञानदृष्टीच्या महत्वाला ज्याचे आंगणही दृष्टीस पडत नाहीं, व ज्यांच्यात आकाशाचा समावेश झाला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!