सार्थ ज्ञानेश्वरी – ||अध्याय ८ वा अक्षरब्रह्मयोग: – ओवी १७१ ते १८०

तेंविं आकारलोपासरिसें ।जगाचें जगपण भ्रंशे ।परि जेथ जाहालें तें जैसें ।तैसेंचि असे ॥ १७१॥
त्याप्रमाणे, आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जगपण नाहींसे होते ; परंतु ज्याच्यावर हे झाले आहे, त्या ठिकाणी ते जसेच्या तसेच असते..
तैं तया नांव सहज अव्यक्त ।आणि आकारा वेळीं तेंचि व्यक्त ।हें एकास्तव एक सूचित ।एऱ्हवीं दोनी नाही ॥ १७२॥
तेव्हांच त्याला ‘अव्यक्त’ असे म्हणतात आणि साकार होतो त्यालाच ‘ व्यक्त ‘ म्हणतात.ही एकाला एक दाखविणारी आहेत. परंतु पाहून गेले असता दोन्ही नाहीत.
जैसें आटलिया स्वरूपें ।आटलेपण ते खोटी म्हणिपे ।पुढती तो घनाकारू हारपे ।जे वेळीं अळंकार होती ॥ १७३॥
ज्याप्रमाणे रूपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात, पुढे त्याचे दागिने बनल्यावर ती लगड नाहींशी होते…
हीं दोन्ही जैशीं होणीं ।एकीं साक्षीभूत सुवर्णी ।तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी ।वस्तूच्या ठायी ॥ १७४॥
ही दोन्ही रुपांतरे जशी एका रुप्यावरच होतात, त्याचप्रमाणे, व्यक्त व अव्यक्त हे दोन्ही विकार ब्रह्माच्याच ठिकाणी होतात.
तें तरी व्यक्त ना अव्यक्त ।नित्य ना नाशवंत ।या दोहीं भावाअतीत ।अनादिसिध्द ॥ १७५॥
ते ब्रह्म तर व्यक्त नाहीं आणि अव्यक्तही नाही, उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही ; परंतु या दोन्ही स्थितीच्या पलीकडले अनादिसिद्ध असे आहे.
जें हें विश्वचि होऊनि असे ।परि विश्वपण नासिलेनि न नासे ।अक्षरें पुसिल्या न पुसे ।अर्थु जैसा ॥ १७६।।
जे ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्वपण लयाला गेले तरी ते लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ पुसला जात नाही.
पाहें पां तरंग तरी होत जात ।परि तेथ उदक तें अखंड असत ।तेवीं भूताभावीं नाशिवंत ।अविनाश जें ॥ १७७॥
पहा की, उदकावर तरंग येतात व जातात, परंतु उदक हे कायमच असते. त्याप्रमाणे, भुते नाहींतशीं झाली असतां अविनाशी परब्रह्म नाश पावत नाही.
ना तरी आटतिये अळंकारी ।नाटतें कनक असे जयापरी ।तेवीं मरतिये जीवाकारीं ।अमर जें आहे ॥ १७८॥
किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही, त्याप्रमाणे मृत्यु पावणाऱ्या शरीरांत जे अमर आहे…
जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें ।म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे । जें मनबुद्धी न सांपडे ।म्हणऊनियां ॥ १७९॥
ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटलें असतां त्याची स्तुति केली असे वाटत नाही , कारण जे मन व बुद्धि यांना सापडत नाही..
आणि आकारा आलिया जयाचें ।निराकारपण न वचे ।आकारलोपें न विसंचे ।नित्यता गा ॥ १८०॥
जे आकाराला आले असताही ज्याचे निराकारपण जात नाही, व आकाराचा नाश झाला असतां ज्याची नित्यता बिघडत नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!