सार्थ ज्ञानेश्वरी – ||अध्याय ८ वा अक्षरब्रह्मयोग: – ओवी २०१ ते २१०

लोहाचें कनक जहालें ।हें एकें परिसेंचि केलें ।आतां आणिक कैंचें तें गेलें ।लोहत्व आणी ॥ २०१॥
लोखंडाचे एका परिसाने सोने बनले, नंतर कोणता दुसरा असा दगड आहे, की त्याचे गेलेले लोखंडपण परत आणील ?
म्हणोनि तूप होऊनि माघौतें ।जेवीं दूधपण न येचि निरूतें ।तेविं पावोनियां जयातें ।पुनरावृत्ति नाहीं ॥ २०२॥
म्हणून, तुपाचे ज्याप्रमाणे पुनः खरोखर दूध होत नाही, त्याप्रमाणे, ज्याप्रत गेले असतां पुनः जन्म नाही..
तें माझें परम ।साचोकारें निजधाम ।हें आंतुवट तुज वर्म ।दाविजत असें ।। २०३॥
त्याप्रमाणे, ज्याप्रत गेले असतां पुनः जन्म नाही, ते माझे खरोखर उत्तम ठिकाण होय. हे गुह्य वर्म तुला स्पष्ट करून सांगितले आहे.
【यत्र काले त्वानावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३॥】
➖➖➖➖➖➖➖➖➖
तेवींचि आणिकेंही एके प्रकारें ।जाणतां आहे सोपारें ।तरि देह सांडितेनि अवसरें ।जेथ मिळती योगी ॥ २०४॥
त्याचप्रमाणे , देहावसानानंतर ज्या स्वरुपाला योगी प्राप्त होतात, ते गुह्य वर्म आणखी एक प्रकाराने समजण्याला सोपे आहे..
अथवा अवचटें ऐसें घडे ।जे अनवसरें देह सांडे ।तरि माघौतें येणें घडे ।देहासीचि ॥ २०५॥
अथवा अकस्मात् असे घडते की, जे योगी अकाली देह सोडतात, त्यांना पुनः देह धारण करावा लागतो.
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती ।तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती ।एऱ्हवीं अकाळीं तरी येती ।संसारा पुढती ॥ २०६॥
त्यांना पुनः देह धारण करावा लागतो. म्हणून, शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले, तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात येरव्ही अकाली देहावसान झाल्यावर पुनः जन्मास येतात.
तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ति ।या दोन्ही अवसराअधीन आहाती ।तो अवसरू तुजप्रती ।प्रसंगें सांगों ॥ २०७॥
त्याचप्रमाणे, मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. असा जो काल , तो प्रसंगानुसार तुला सांगतो.
तरि ऐकें गा सुभटा ।पातलिया मरणाचा माजिवटा ।पांचै आपुलालिया वाटा ।निघती अंती ॥ २०८॥
तर हे महावीरा अर्जुना, ऐक. मरणकाल समीप आला असतां शेवटी पंचमहाभूतें आपापल्या रस्त्याने जातात.
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळी ।बुद्धीतें भ्रमु न गिळी ।स्मृति नव्हे आंधळी ।न मरे मन ॥ २०९॥
असा मरणकाल प्राप्त झाला असतां बुद्धीला भ्रांति गिळीत नाही, स्मरणशक्ती अंधळी होत नाही, व मनही मरत नाही.
हा चेतनावर्गु आघवा ।मरणी दिसे टवटवा ।परि अनुभविलिया ब्रह्मभावा ।गवसणी होऊनि ॥ २१०॥
ज्याने ब्रह्मभावाचा अनुभव घेतला आहे, तोच त्या ब्रह्माचा अंतर्यामी उपभोग घेतो. म्हणून हा सगळा प्राणसमुदाय मरणसमयी टवटवीत दिसतो.
भगवान श्री गोपाळकृष्ण भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली चरणाॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!