सार्थ ज्ञानेश्वरी – ||सांख्य योग| – ओवी २५० पासून

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् |व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ||२-४४||

अर्थ 👉  त्या विषय व ऐश्वर्य यांच्या ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने विवेकबुद्धी आच्छादित झालेल्या पुरुषांच्या अंत:करणामधे आत्मतत्वविषयक बुद्धी उद्भवत नाही

—-🌹—-

🌼परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।यज्ञपुरुषा चुकती ।भोक्ता जो ॥२५०॥

     परंतु ते एकच गोष्ट वाईट करतात, ती हीच की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा त्याला विसरतात.

🌱जैसा कर्पुराचा राशि कीजे ।मग अग्नि लाऊनि दीजे ।कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥

     ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लाऊन द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे.

🌼दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें॥ २५२ ॥

      किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात.

🌱सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे ।परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ॥ २५३ ॥

     मोठ्या सायासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी ? पण पहा, ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे?

🌼जैसे रांधवणी रससोय निकी । करुनियां मोले विकी ।तैसा भोगासाठी अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥

    ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात. 

🌱म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥२५५॥

    म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामधे मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव. 

—-🌹—-

🔔त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन |निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ||२-४५||

अर्थ 👉  हे अर्जुना, वेद त्रिगुणात्मक (संसाराचे) प्रतिपादन करणारे आहेत. तू त्रिगुणातीत हो, द्वंद्वरहित हो, नित्य सत्वगुणी हो, योगक्षेमरहित हो आणि आत्मनिष्ठ हो. आत्मसुखाला विसरू नकोस.

—-🌹—-

🌼तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणे निभ्रांत ।म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्विक ते ॥२५६॥

     तू असे नि:संशय समज की वेद हे सत्व, रज व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत. 

🌱येर रजतमात्मक।जेथ निरुपिजे कर्मादिक ।जे केवळ स्वर्गसूचक ।धनुर्धरा ॥२५७॥

     आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. 

🌼म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण ।एथ झणे अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥

     म्हणून हे केवळ सुखदु:खाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस.

🌱तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ॥ २५९ ॥

    तू तिन्ही गुण टाकून दे, मी माझेपण धरू नकोस. पण अंत:करणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!