स्वस्वरूपाचे पूर्ण ज्ञान झाल्याशिवाय कर्तेपणा जात नाही

आपण आयुष्यात एकातरी गोष्टीचा त्याग केला आहे का? तुम्ही म्हणाल `हो, `आता मी स्वतःच्याच मनाप्रमाणे गोष्टी व्हाव्या हा आग्रह सोडला आहे’ इत्यादी. पण जरा विचार करा, आत्तापर्यंत ज्या गोष्टींचा त्याग केला आहे त्याआधी ती गोष्ट जवळ ठेवण्यापेक्षा सोडणे योग्य आहे ह्या ज्ञानाचा तुम्ही अंगिकार केला होता हे तुमच्या ध्यानात येईल. त्या ज्ञानप्राप्तीचा परिणाम म्हणून आपण त्याच्या विरोधाभासी वर्तन वा आपलेच खरे हा हट्ट सोडून तडजोड करतो. पहील्या अध्यायात अर्जुन जेव्हा हातातील धनुष्य टाकून होणाऱ्या युध्दाबद्दल खेद व्य‍त करतो

तेव्हा ज्ञानेश्वरीत माऊली असे म्हणते की अर्जुनाचा मनात कौरवांबद्दल, भीष्माबद्दल दया उत्पन्न झाली तेव्हा त्याच्या मनातील वीरवृत्ती आपोआप निघून गेली. करुणा ही युध्दातील शौर्याच्या विरुध्द असल्याने त्याच्या हातातील धनुष्य आपोआप गळून पडले. त्यामुळे कर्तेपणाचा त्याग करायचा असेल तर कर्तेपणा चुकीचा आहे हे ज्ञान आधी मिळविले पाहीजे. मग आपोआपच कर्तेपणा नष्ट होईल.

कुठले ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्तेपणा नष्ट होईल? आपल्या स्वरुपाचे ज्ञान झाल्यावर! आणि आपले रुप एक आहे का? असे बघा की आपल्या पालकाच्या रुपाला मुलावर चांगले संस्कार केल्याचा अभिमान आहे. आपल्या विद्यार्थीपणाला परीक्षेत पहिला आल्याचा गर्व आहे आणि आपल्या नवरेपणाला सुशील बायकोबद्दल आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा आपण पालक असतो तेव्हा परीक्षेत किती गुण मिळाले आहेत याच्याशी संबंध नसतो वा आपण कचेरीत किती उच्च पदावर काम करीत आहोत याचा विचार नसतो.

आपल्या प्रत्येक कर्माचा कर्ता म्हणजे आपले एक रुप आहे हे तुम्हाला दिसून येईल. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा बाजूला लिहीलेल्या आकड्यांवर फिरत असतो त्याप्रमाणे आपण एका रुपातून दुसऱ्या रुपात सतत फिरत असतो व प्रत्येक रुपाच्या अनुषंगाने कर्मे करीत असतो. आपले सर्व जीवन असे निरनिराळ्या रुपातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यातच व्यतीत झाले आहे हे तुमच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. अशी वस्तुस्थिती असल्याने कुठल्या रुपाला स्वरुप म्हणावे याचा संभ्रम आपल्या मनात साहजिकपणे उत्पन्न होतो.

खऱ्या स्वरुपाचे ज्ञान म्हणजे काय तर ह्या सगळ्या अस्थिरतेत आपले एक रुप स्थिर आहे हे जाणविणे व त्या रुपात मुरुन राहणे. ज्याप्रमाणे घड्याळाच्या काट्याचे एक टोक परीघावर फिरत असले तरी दुसरे टोक केंद्रस्थानी स्थिर असते त्याचप्रमाणे आपले एकच अस्तित्व ही वेगवेगळी रुपे घेत आहे हे स्वसंवेदनापूर्वक जाणणे म्हणजेच स्वरुपाचे ज्ञान होणे होय. जन्मापासून आपण एकच व्यक्‍ती आहोत याबद्दल आपल्याला अजिबात संदेह नसतो. उदाहरणार्थ, धंदा चालला म्हणून रंकाचे राव झालो तरी एकाच व्यक्तीने गरीबीतून कष्ट करुन श्रीमंती प्राप्त केली आहे हे सर्व जाणतातच. हे आपले अचल रुप कुठले? का आपण असे समजतो की `मी’ आधी लहान मुलगा होतो आणि आता `मला’ लहान मुलगा झाला आहे?

तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी या दोघांना एक मानण्याकरीता त्यांच्यात कुठलेतरी साम्य असले पाहीजे. ते आपण शोधले पाहीजे. स्थळ-काळात न सापडणारी वस्तूच या दोन्ही रुपांना समान असू शकते. आपल्यामध्ये अशी कुठली वस्तू आहे याचा शोध घ्या. त्या वस्तूलाच आपण `सो अहम्‌’ असे म्हणू शकतो. ह्या स्वरुपाचे ज्ञान झाले की बाकी दुसऱ्या रुपांचे मिथ्यत्व आपोआप लक्षात येते व त्या रुपांकडून घडलेल्या कर्मांबद्दलचा कर्तेपणा नष्ट होतो.

ज्या लोकांना आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आहे ते आपल्या अशा रुपात अडकून पडले आहेत की ज्या रुपात राहून त्यांनी आपल्या मनाप्रमाणे कर्मे केली आहेत. सचिन तेंडुलकर उत्तम क्रिकेट खेळतो या रुपातच अडकून पडला तर मैदानाबाहेर त्याचे अस्तित्वच नाही असे आपल्याला समजावे लागेल. घरी गेल्यावर बायको-मुलांपुढे त्याला आणि आपल्या प्रत्येकाला कौटुंबिक रुपातच सामोरे जावे लागते. तेव्हा एका रुपाला महत्व देण्यात आपण स्वतःचे संपूर्णत्व गमावतो आहे हे लक्षात आले की आपली साधना सुरु झाली आहे असे समजावे. परमार्थात आपले काम स्वतःचा शोध घेणे सुरु करणे एवढेच आहे. बाकी सर्व बघायला भगवंत समर्थ आहे यात शंकाच नाही. चला, आपण सर्व जण आपापल्या शोधात लागू या!

॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.

ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!