अष्टावक्र गीता – अध्याय तिसरा – भाग १०

राजा तू मोक्षप्राप्ती होण्याची पात्रता अंगात बाळगून आहेस का ?

अष्टावक्र मुनींनी सांगितलेली धीर पुरुषाची लक्षणे आपण पहात आहोत. धीर पुरुष जीवनाकडे खेळ म्हणून पहात असल्याने त्याला सुख दुःख , मान अपमान या बाबींचं काहीच वाटत नाही. तसेच तो स्वतःच्या शरीराकडे दुसऱ्याचं शरीर असल्याप्रमाणे पाहतो. दुसऱ्याने त्याची केलेली निंदा वा स्तुती या दोन्हीशीही त्याला काहीही देणेघेणे नसते. कारण तो जाणून असतो की , हे सर्व त्याच्या जागृत अवस्थेला लागू असून तो तर साक्षी असतो.

धीर पुरुषाबद्दल पुढे सांगताना मुनी म्हणतात , ” राजा धीर पुरुष या विश्वाकडे माया म्हणजेच असत्य म्हणून पाहतो सहाजिकच त्याला या विश्वाबद्दल काहीही औत्सुक्य उरलेले नसते. त्यामुळे तो मृत्यलाही भीत नाही.”

मृत्यूबद्दल प्रत्येकाला भय वाटत असतं. माणसाची जगण्याची हौस शेवटपर्यंत संपत नाही. तसंच आपल्यानंतर आपल्या मुलाबाळांचं कसं होईल या काळजीने तो स्वतःच्या मृत्यूला घाबरत असतो. हे झालं स्वतःबद्दल पण माणूस जिवंतपणी जास्त घाबरतो ते प्रियजनांच्या मृत्यूबद्दल. त्याची प्रिय व्यक्ती संकटात सापडली की , सर्वप्रथम त्याला त्याच्या वियोगाची भीती वाटत असते आणि त्याची खुशाली जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो कासावीस झालेला असतो.

धीर पुरुष मात्र या जगाला माया म्हणजे असत्य समजत असल्याने त्याला कसली काळजी नसते वा पुढं कसं होईल याबद्दल कसलं औत्सुक्यही नसतं. त्याच्यादृष्टीने मृत्यू म्हणजे आत्मा आणि शरीर वेगळे होणे ही क्रिया असते. तो म्हणतो यात भिण्यासारखं काय आहे ? शरीर इथंच राहतं आणि आत्मा त्याच्या पुढील प्रवासाला निघून जातो. असे धीर पुरुष प्रियजनांच्या व स्वतःच्या मृत्यूला सहजपणे स्वीकारतात.

कठोपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे नचिकेता वडिलांच्या इच्छेनुसार मृत्यूदेव यमराज यांच्या शोधात यमलोकी गेलेला असताना त्याला यमराज भेटत नाहीत. कारण जे निर्भय होऊन मृत्यूच्या शोधात निघतात त्यांची आणि मृत्यूची गाठच पडत नाही. ते अमर होतात. करण त्यांनी मृत्यूचं सत्य जाणलेलं असतं.

धीर पुरुषाच्या पुढच्या वैशिठ्याबद्दल सांगताना मुनी म्हणाले , ” तो महात्मा मनात मोक्षाचीही इच्छा करत नाही. कारण तो आत्मज्ञानाने तृप्त असतो.”

माणसाला जीवनामध्ये संपत्ती , स्त्री , सन्मान आणि समाज यांचा मोठाच आधार वाटत असतो. यांच्या आधारे तो जीवनात निरनिराळ्या अनेक इच्छा करत असतो. त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धावपळ करत असतो. वास्तविक पाहता त्याला वरील चार आधारापेक्षा परमेश्वराचा आधार वाटायला हवा. वरील चार आधारावर तो आयुष्याची इमारत बांधायला जातो पण मूळ पायाच भुसभुशीत असल्याने इमारत पक्की कशी होणार ? म्हणून आयुष्याच्या शेवटी अनेक अपुऱ्या इच्छा आकांक्षा उराशी बाळगून तो मृत्यू पावतो आणि त्याच्या या अपुऱ्या इच्छाआकांक्षा त्याच्या पुनर्जन्माचं कारण होतात.

बाळगलेल्या इच्छाआकांक्षा पूर्ण होण्यासाठी पूर्वपुण्याईची गरज असते. कारण त्यानुसारच त्याला या आयुष्यात पैसा , बुद्धी आणि नशीब यांची प्राप्ती होत असते. पण हे लक्षात न घेता तो आयुष्यभर त्याच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता धावत असतो. मग त्या त्याच्या आवाक्यातल्या असोत वा नसोत !

धीर पुरुष अशा कोणत्याही इच्छा करत नाही. तो इतका निरिच्छ असतो की त्याला मोक्षाचीही इच्छा नसते. कारण त्याला झालेल्या आत्मज्ञानाने त्याने जाणलेलं असते की , कोणतीही इच्छा बाळगलीच नाही की , मोक्षाची अवस्था त्याला इथंच या जन्मातच प्राप्त होणार असते. मोक्ष ही सतत आहे तशीच राहणारी अवस्था आहे.

संत महात्मे असेच आत्मज्ञानाने तृप्त असतात. त्यामुळे ते कायम निजानंदात मग्न असतात. व्यवहारी जगाशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. कारण ते या जगाकडे साक्षीत्वाने बघत असतात.

तेव्हा जगात इतर कोणत्याही इच्छांची पूर्तता होण्यासाठी पूर्वपुण्याईची गरज असते पण संत महात्मे यांच्यासारखं जीवन जगण्यासाठी पात्रता यावी लागते आणि ती पात्रता आपण या जन्मात मिळवू शकतो. त्याला पूर्वपुण्याईची गरज नसते हे जो ध्यानात ठेवेल तो इथंच मोक्षप्राप्ती करून घेईल.

म्हणून मुनिवर्य राजाला विचारतात की , “राजा तू मोक्षप्राप्ती होण्याची पात्रता अंगात बाळगून आहेस का ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!