अष्टावक्र गीता – अध्याय तिसरा – भाग ८

राजा तू निस्वार्थी आहेस का ?

विरागी , विवेकी आणि मुमुक्षु मंडळीसुद्धा मोक्ष नको म्हणत असतात कारण तिथे संपत्ती , स्त्री , सन्मान , समाज यापैकी काहीच उपलब्ध नसते. बरं यापैकी कशाचीच अपेक्षा नसली तरीही साधकाला मोक्षाची भीती वाटत असते कारण मोक्ष ही एक कधीही न बदलणारी अवस्था आहे आणि साधकाला जीवनात काही ना काही बदल हा नेहमीच हवा असतो. बदल किंवा परिवर्तन हवंसं वाटणं हा माणसाचा स्थायी भाव आहे.

एकदा एका राजाला एका गुहेत एक तळं असून त्याचं पाणी प्यायलं तर माणूस अमर होतो असं कळतं. अमर होण्यासाठी तो तिकडे धाव घेतो. गुहेत जाऊन तळ्याच्या काठावर उभा राहून तो पाणी पिणार एवढ्यात तिथ एक कावळा येतो आणि राजाला म्हणतो , ” राजा , पाणी पिण्यापूर्वी मी काय सांगतोय ते ऐक , या तळ्याचं पाणी पिऊन मी फसलो आहे. कितीतरी शेकडो हजारो वर्षांपूर्वी मी या तळ्याचं पाणी पिऊन अमर झालोय आणि मी हे पाणी का पिलं , असा मला सतत पश्चात्ताप होत असतो. कारण राजा माझं आयुष्य एक कंटाळवाणं निरस आयुष्य झालंय. कारण यात कधीही कसलाही बदल नाही. त्यामुळं या अमरत्वाचं करायचं काय असा प्रश्न मला सतत भेडसावत असतो.

माझ्या बरोबरचे सगळे केव्हाच निघून गेले आणि मी एकटाच या अनोळखी जगात वावरतोय. तुझी अशी अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर पाणी पिण्यापूर्वी दहा वेळा विचार कर.”
राजाला वस्तूस्तिथीची जाणीव झाली आणि त्या कावळ्याचे आभार मानून , तळ्याचं पाणी न पिताच तो राजवाड्यात परतला.

वरील कथेच्या पार्श्वभूमीवर लक्षात येतंय की , अमरत्व आणि मोक्ष म्हणजे सतत एकाच अवस्थेत राहणे आणि हेही लक्षात येतंय की , सतत काहीतरी बदलाची , परिवर्तनाची अपेक्षा करणाऱ्या समस्त समाजाला ही कल्पना सहजासहजी पचणारी नाही.

माणसाला जगाचा मोह सुटत नाही कारण जगाशी माणसाचे स्वार्थाचे सबंध असतात. जगाकडून आपल्याला खूप अपेक्षा असतात. अगदी म्हातारा मनुष्य सुद्धा कंटाळलो बुवा आता मरण आलं तरी चालेल असं म्हणत असतो कारण त्याला घरात कुणी विचारत नसतं , त्याचा सल्ला घेत नसतं , एका जागी पडून पडून तो कंटाळून गेला असतो आणि अशा अवस्थेत बदल म्हणून का होईना त्याला मृत्यू हवा असतो. पण मरणाची वाट बघत बसण्यापेक्षा आहे या अवस्थेचा उपयोग करून घेऊन स्वतःचा उद्धार करून घ्यावा अशी इच्छा काही त्याला होत नसते.

जेव्हा जगाकडून आपण अपेक्षा करणे बंद करू तेव्हा आपले मन स्थिर होईल. ज्याला धनाचा मोह नाही , परिवर्तनात रस नाही त्यालाच असे वाटते की , जीवनामध्ये मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊन आपला उद्धार करून घ्यावा. त्यासाठी निस्वार्थ , निष्काम होणे आवश्यक आहे.

ज्याक्षणी हे साधेल त्याक्षणी मोक्षाचे भय वाटणे बंद होईल. कारण निस्वार्थ , निष्काम , निरपेक्ष अवस्थेत राहणे म्हणजेच मोक्ष हे त्याला कळलेले असते आणि ती अवस्था त्याने राजीखुषीने स्वीकारलेली असते. अशा अवस्थेत ना त्याला कुठल्या धनाचा आधार वाटत असतो , ना त्याला परिवर्तनाची अपेक्षा असते !

म्हणून मुनी राजाला विचारतायत , “राजा , तूझं मन स्थिर आहे का ? तू निस्वार्थी आहेस का ?”

अशा मन स्थिर झालेल्या व्यक्तीला अष्टावक्र मुनी धीर पुरुष म्हणतात त्याविषयी जाणून घेऊयात पुढील भागापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!