तुकाराम महाराज अभंगगाथा – १६७

एक तटस्थ मानसीं ।
एक सहजचि आळसी ॥१॥

एखाद्या स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या मनात कशाचीच इच्छा नसल्यामुळे त्याची देह-इंद्रिये निर्व्यापार झालेली असतात.. त्यामुळे तो शांत असतो ..त्या उलट एखादा तमोगुणी मनुष्यदेखील आळसामुळे काहींच करत नाही.. म्हणून तोही सहजच शांत असतो..

दोन्ही दिसती सारिखीं ।
वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥

ह्या दोन्ही अवस्था दिसायला सारख्याच दिसतात.. पण या दोन्ही अवस्था मधील फरक जाणत्यालाच समजत असते..

एक ध्यानीं करिती जप ।
एक बैसुनि घेती झोप ॥२॥

एखादा ध्यानयोगी डोळे मिटून हरिनामाचा जप करीत असतो, तर दुसरा आसनावर बसून झोप घेतो..

एकां सर्वस्वाचा त्याग।
एकां पोटासाठीं जोग ॥३॥

विरक्त पुरुष सर्वसंगपरित्याग करतात, तर काहीजण पोटासाठी बैरागी होतात..

एकां भक्ति पोटासाठीं ।
एकां देवासवें गांठी ॥४॥

एकाची भक्ती भगवंतासाठी असते, तर दुसऱ्याची भक्ती पोटासाठी असते..

वर्म पोटीं एका ।
फळें दोन सांगेतुका ॥५॥

जगतगुरु तुकोबाराय म्हणतात; याप्रमाणे एक सारख्या दिसणाऱ्या या दोन अवस्थांचा पोटातूनच परमार्थ आणि संसार अशी दोन फळे निर्माण होतात. हे वर्म मी तुम्हास सांगतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!