तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र. १०८

(प्रस्तुत अभंगात तुकोबा, प्रेमाने देवाचा निष्ठूरपणा सांगत आहेत. प्रिय व्यक्तीचे आपल्यावरील प्रेम जाणिवपुर्वक लपवून तो कसा निष्ठूर आहे, ही परीभाषा देखील आत्यंतिक प्रेमातूनच प्रकट होणारी आहे. तुकोबांनी देवाला उपरोधिकपणे तू कसा निष्ठूर आहेस, हे येथे म्हटले आहे.)

हरी तू निष्ठूर निर्गुण । नाही माया बहू कठीण ।

नव्हे ते करीसी आन । कवणे नाही केले ते ।।१।।

घेऊनि हरीश्चन्द्राचे वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व ।

पुत्र पत्नी जीव । डोंबा घरी वोपविली ।।२।।

नळदमयंतीचा वियोग । विघडीला त्यांचा संग ।

ऐसे जाणे जग । पुराणेही बोलती ।।३।।

राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळू दयाळू भूती ।

तुळविले अंती । तुळे मांस तयाचे ।।४।।

कर्ण भिडता समरंगणी । बाणीं व्यापियेला रणी ।

मागसी पाडोनि । तेथे दात तयाचे ।।५।।

बळी सर्वस्वे उदार । जेणे उभारिला कर ।

करुनि काहार । तो पाताळी घातला ।।६।।

श्रियाळाच्या घरी । धरणे मांडिले मुरारी ।

मारविले करी । त्याचे बाळ त्या हाती ।।७।।

तुज भावे जे भजती । त्यांच्या संसारा हे गती ।

ठाव नाही पुढती । तुका म्हणे करीसी ते ।।८।।
अर्थ-
तुकोबा म्हणतात – देवा तू नुसताच निर्गूण नाहीस (अर्थात सगूणही आहेस.) तसेच निष्ठूर नाही म्हणावं तर तुझी माया मोठी कठीण आहे. जे तुझी अनन्यभावाने भक्ती करतात, त्यांच्या बाबतीत तू असे काही घडवून आणतोस, ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते. ।।१।।
देवा ! तू सत्यवादी राजा हरीश्चंद्राचे अख्खे राजवैभव घेऊन टाकलेस आणि त्याच्यावर त्याची पत्नी व मुलगा विकण्याची वेळ आणून डोंबाघरी पाणी भरायला लावलेस.।।२।।
एकमेकांवर जीवापाड प्रेम असणाऱ्या नल – दमयंतीचा तू वियोग घडवून आणलास. परंतु तुझे हे कारनामे सगळे जग जाणते आणि पुराणेसुद्धा असेच सांगतात. ।।३।।
राजा शिबी हा चक्रवर्ती सम्राट होता. तो सगळ्या प्राण्यांबद्दल अत्यंत दयाळू होता. परंतु एका कबूतराचा जीव वाचवण्याच्या बदल्यात तू त्याच्या मांडीचे मांस तराजूत टाकून तोलले. ।।४।।
कर्ण हा खरोखरच किती थोर होता. तो रणांगणात एकटा पडल्यावर त्याला तू बाणांनी व्यापून टाकले आणि त्याचे दात पाडलेस. ।।५।।
बळी राजा हा तर मोठा उदार अंतःकरणाचा होता. तसेच तुझा थोर भक्तदेखील होता. परंतु तू छळकपट करुन त्याला पाताळात ढकललेस.।।६।।
श्रियाळाच्या घरी तू पाहुणा बनून गेलास आणि त्याच्या मुलाचे मांस खायचे असा हट्ट धरुन बसलास. शेवटी तू श्रियाळाच्या हातून मुलाचे मांस स्वतःच्या ताटात वाढून घेतलेस. ।।७।।
देवा ! जे लोक तुला अनन्यभावाने भजतात त्यांच्या संसाराची तू अशी राखरांगोळी करुन टाकतोस. आता यानंंतर पुढे काय करशील याचा देखील नेम नाही. ।।८।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!