तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र. ११०२

(दोन धूर्तांची परस्परांशी गाठ पडल्यावर एकमेकांच्या मनातील ते कसे ओळखतात, याचे एका कथेच्या माध्यमातून मजेदार वर्णन तुकोबांनी केले आहे. -)

वाघे उपदेशिला कोल्हा ।

सुखे खाऊ द्यावे मला ।।१।।

अंती मरसी ते न चुके ।

मजही मारितोसि भुके ।।२।।

येरु म्हणे भला भला ।

निवाड तुझ्या तोंडे झाला ।।३।।

देह तंव जाणार ।

घडेल हा परोपकार ।।४।।

येरु म्हणे मनी ।

ऐसे जावे समजोनि ।।५।।

गाठ पडली ठका ठका ।

त्याचे वर्म जाणे तुका ।।६।।
अर्थ –
एकदा वाघ आणि कोल्हा यांची परस्परांशी गाठ पडली. तेव्हा वाघाने कोल्ह्याला म्हटले की, कोल्होबा! तू मला सुखाने खाऊ दे. ।।१।।
तू तसाही शेवटी म्हातारा होऊन मरणारच आहेस. मग स्वतःचा बचाव करुन मलाही कशाला भूकेला मारतोस ? ।।२।।
(वाघाच्या तावडीत सापडलेल्या कोल्ह्याला कळून चुकले की, आपण तसेही आता वाचणार नाहीच. त्यापेक्षा मरणाचे भांडवल करायला काय जातेय ? म्हणून ) कोल्हा म्हणाला – वा ! वा ! वाघोबा हा न्यायनिवाडा तुमच्याच तोंडाने झाला हे फार उत्तम झाले. ।।३।।
हा देह तर तसाही नाशवंतच असल्याने शेवटी जाणाराच आहे. त्यापेक्षा हा देह कुणाच्यातरी कामी आला, यापेक्षा मोठा उपकार तो कोणता म्हणायचा ? ।।४।।
कोल्ह्याच्या ह्या बोलण्यावर वाघ मनात म्हणाला, कोल्ह्या ! अरे अशी परोपकाराची भाषा बोलण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का ? म्हणून माझ्या मनात काय आहे, हे तू मनोमन ओळखून घे. ।।५।।
तुकोबा म्हणतात, दोन धूर्त व्यक्ती एकमेकांना भेटल्यानंतर ते एकमेकांच्या मनातील कपट जसे ओळखतात, त्याचे वर्म मलाही माहित आहे. ।।६।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!