(कर्ता करविता भगवंतच आहे, ही गोष्ट प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -)
आपुलिया बळे नाही मी बोलत ।
सखा कृपावंत वाचा त्याची ।।१।।
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी ।
बोलविता धनी वेगळाची ।।२।।
काय म्या पामरें बोलावी उत्तरे ।
परि त्या विश्वंभरे बोलविले ।।३।।
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
चालवी पांगळा पायावीण ।।४।।
अर्थ –
तुकोबा म्हणतात, मी जे काही बोलतो ते स्वतःच्या बळाने नाही बोलत. माझा अत्यंत कृपाळू मित्र भगवंत आहे, त्याचीच ही वाचा आहे. ।।१।।
साळुंकी (पोपट) मधूर असे शब्द बोलते; परंतु त्याला ते शब्द बोलायला लावणारा दुसरा कुणीतरी असतो. ।।२।।
तसे पाहिले तर माझ्यासारख्या पामर माणसाने काय बोलावे; परंतु तो विश्वंभरच माझ्याकडून हे सगळे बोलवून घेतो. ।।३।।
तुकोबा म्हणतात, अहो त्या विश्वंभराची कला कोण बरे समजते ? त्याने मनात आणले तर पांगळ्या मनुष्यालाही तो चालायला लावतो. ।।४।।