जोंवरी तोंवरी जंबूक करी गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिले नाही ।।१।।
जोंवरी तोंवरी सिंधु करी गर्जना ।
जंव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही ।।२।।
जोंवरी तोंवरी वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी पडली नाही ।।३।।
जोंवरी तोंवरी शूरत्वाच्या गोष्टी ।
जंव परमाईचा पुत्र देखिला नाही ।।४।।
जोंवरी तोंवरी माळा मुद्रांची भूषणे ।
जंव तुकयाचे दर्शन झाले नाही ।।५।।