तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.१६५९

(व्यभिचारी मनुष्याच्या कर्मगतीचे वर्णन -)

परद्रव्य परनारीचा अभिलास ।

तेथोनि हरास सर्व भाग्या ।।१।।

घटिका दिवस वर्ष मास लागे तीन ।

बांधले पतन गांठोळीस ।।२।।

पुढे घात त्याचा रोकडा शकून ।

पुढें करी गूण निश्चयेसी ।।३।।

तुका म्हणे एका थडताथंवड ।

काळ लागे नाड परि खरा ।।४।।

अर्थ –
जो मनात दुसऱ्याचे धन आणि परस्त्रीची अभिलाषा ठेवतो, तेथून त्याच्या पतनास सुरुवात होते. ।।१।।
त्या वेळेपासून त्याचे पतन तीन घटिका, तीन दिवस, तीन महिने किंवा तीन वर्षे एवढ्या काळात होते. ।।२।।
पुढे वाईट होणार असल्याची चिन्हे त्याला आधीपासूनच दिसायला लागतात. कारण त्याने आधी केलेल्या कर्मांचे फळ उदयाला येत असते. ।।३।।
तुकोबा म्हणतात, अशा व्यभिचारी मनुष्याचा नाश लगेच होतो किंवा सावकाशपणे काही काळाने होतो; पण त्याचा नाश होतो एवढे मात्र निश्चित आहे. ।।४।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!