तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.१९६

(रावणाने अपहरण करुन नेलेल्या सीतेचे मनोगत प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -)

वासुगीच्या बनी सीता शोक करी । काहों अंतरले रघूनाथ दुरी ।

येऊनी गुंफेमाजी दुष्टे केली चोरी । काहों मज आणिले अवघड लंकापुरी ।।१।।

सांग वो त्रिजटे सखिये ऐसी मात । देईल का भेटी नेदी रघूनाथ ।

मन उतावीळ जाला दूरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ।।२।।

काय दुष्ट आचरण होते म्या केले । तीर्थ व्रत होतें कवणाचे भंगिले ।

गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडीले । न कळे वो संचित चरण अंतरले ।।३।।

नाडियेलें आशा मृगकांतिसोनें । धाडिलें रघूनाथा पाठविले तेणे ।

उल्लंघिली आज्ञा माव काय मी जाणे । देखूनि सुनाट घेऊन आले सुनें ।।४।।

नाही मुळ मारग लागे आणिक सोय । एकावीण नामें रघुनाथाच्या माय ।

उपटी पक्षिया एक देऊनी पाय । उदकवेढ्यामध्ये तेथें चाले काय ।।५।।

जनकाची नंदिनी दुःखे ग्लांती थोरी । चुकली कुरंगिनी मेळा तैशा परी ।

संबोखी त्रिजटा स्थिर स्थिर वो करी । घेईल तुकयास्वामी राम लंकापुरी ।।६।।
अर्थ –
रावणाने अपहरण करुन नेलेली सीता अशोकवनात शोक करत बसली आहे. ती म्हणते की, रघूनाथ माझ्यापासून का दुरावले हे मला कळत नाही. दुष्ट रावणाने पर्णकुटीत येऊन मला चोरून येथे अवघड अशा लंकापुरीत आणून ठेवले. ।।१।।
(सीता तिच्यावर पहारा ठेवणाऱ्या त्रिजटा नावाच्या राक्षसणीला म्हणते) त्रिजटे ! मला सांग माझे रघूनाथ मला केव्हा भेटतील ? त्यांची वाट बघून माझा जीव कासावीस झाला आहे. माझ्या शरीरात माझे प्राण राहतील असे आता मला वाटत नाही. ।।२।।
मी असे काय दुष्ट आचरण केले होते की माझ्यासोबत असे घडावे ? मी कोणाचे तीर्थव्रत मोडले होते ? कोणत्या गाय वासराची ताटातूट केली होती ? कोणत्या पती पत्नीत भांडण लावून दिले होते ? जर मी असे काहीही केले नव्हते मग तरीही माझ्या नशिबात असे का लिहून ठेवले होते ? ।।३।।
त्या सोन्याच्या हरीणाने माझा खरा घात केला. त्या हरणाच्या मोहात पडून मी रघूनाथांना त्या हरणाला घेऊन यायला सांगितले. लक्ष्मणाने आखून दिलेली रेषा मी ओलांडली. परंतु मला रावणाची माया लक्षात आली नाही. त्या श्वानाने मला एकांतात गाठून मला येथे पळवून आणले. ।।४।।
ह्या संकटातून सुटण्यासाठी माझ्याकडे आता पतीच्या नावाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. त्या कपटी रावणाने जटायू पक्षाच्या अंगावर पाय देऊन त्याचे दोन्ही पंख उपटून टाकले. सभोवती समुद्राचे पाणी असल्याने जटायूला काहीही करता आले नाही. ।।५।।
अशा रितीने ती जनकाची कन्या प्रचंड दुःखाने शोक करु लागली. एकप्रकारे एखादी हरीण तिच्या कळपातून चुकून जंगलात एकटी हरवून जावी. तिला असे शोकमग्न पाहून त्रिजटा राक्षसीण तिला धीर देऊ लागली. तुकोबा म्हणतात, त्रिजटा सीतेला म्हणाली, तू स्वतःला सावर. तुक्याचा स्वामी रघुनंदन श्रीराम लवकरच हे लंकापुरीचे राज्य जिंकून आपले करील. ।।६।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!