तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२०१२

कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ ।

अभागी दुर्बळ भावी सिद्धी ।।१।।

धन्य त्या जाती धन्य त्या जाती ।

नारायण चित्ती साठविला ।।२।।

बीजाऐसा द्यावा उदके अंकुर ।

गुणांचे प्रकार जाणे तया ।।३।।

तुका म्हणे कळे पारखिया हिरा ।

ओझे पाठी खरा चंदनाचे ।।४।।

अर्थ –
कल्पतरू वृक्षाच्या खाली बसून एखाद्या गोष्टीची इच्छा केली तर ती वस्तू लगेच प्राप्त होते. मात्र जो अभागी मनुष्य असतो तो कल्पतरूकडे शाश्वत वस्तूची मागणी न करता सांसारीक सुखाची मागणी करतो. ।।१।।
म्हणून ज्यांनी त्यांच्या चित्तात केवळ नारायणच साठवला आहे, असे लोकच खरे भाग्यवान आहेत. (कारण एका नारायणाशिवाय ते दुसरे काहीच मागत नाहीत.) ।।२।।
जसे बी पेरलेले असते त्याप्रमाणेच त्यातून अंकूर फुटतो. त्यावरूनच गुणांचे प्रकार कळतात. (जे चित्तात असते तेच अंकुरित होऊन कृतीत उतरते.) ।।३।।
तुकोबा म्हणतात, जो खरा पारखी असतो त्यालाच हिरा समजतो. हिऱ्यांनी भरलेली गोणी गाढवाच्या पाठीवर असली तरी गाढवासाठी ती ओझेच असते. (गाढवाला हिरा कळत नाही.) ।।४।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!