तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२१८६

(धार्मिक असल्याचा वरवर देखावा करणाऱ्यांना तुकोबा ह्या अभंगातून फटकारतात-)

काय धोविलें कातडे ।

काळकूट भीतरी कुडे ।।१।।

उगा राहें लोकभांडा ।

चाळविल्या पोरें रांडा ।।२।।

घेसी बुंथी पाणवथा ।

उगाच हालविसी माथा ।।३।।

लावूनी बैसे टाळी ।

मन इंद्रिये मोकळीं ।।४।।

हालवित बैसे माळा ।

विषयजप वेळोंवेळा ।।५।।

तुका म्हणे हा व्यापार ।

नाम विठोबाचे सार ।।६।।
अर्थ-
(देवाधर्माचे सोंग घेणाऱ्याला उद्देशून तुकोबा म्हणतात-) अरे तू शरीराचे कातडे पाण्याने धुवून स्वच्छ केले असले तरी तुझ्या आतील काम, क्रोध, वासनेचा कचरा तसाच आहे, त्याचं काय ? (शरीर धुतले म्हणून तू सोवळा झाला असं तुला वाटत असलं तरी तू खऱ्या अर्थाने अजूनही विटाळलेलाच आहेस.) ।।१।।
हे सगळे सोंग करण्यापेक्षा तू गप्प बसून राहिलास तरी चांगले आहे. उगीच कशाला तुझ्या बायका पोरांना सोडून त्यांचे हाल करतोस ? ।।२।।
तू पाणवठ्यावर बसून अंगावर वस्त्राची खोळ पांघरतो आणि अंघोळ करतोस. अंघोळ करताना तू दाटूवाटीची मान हालवून हे दाखवतोस की तू फार मोठा कर्मठ आहेस. ।।३।।
तू ध्यानाचे सोंग घेऊन मौन धारण करतोस; परंतु तुझे मन आणि इंद्रिये यांना तू मोकळे सोडून देतोस. (म्हणजे मनात वासनेचे चिंतन करतोस.) ।।४।।
तू जप करण्यासाठी हातात माळ घेऊन बसतोस; परंतु तुझ्या मनात देवाच्या नामाऐवजी विषयांचा जप (उपभोगाचे विचार) सूरू असतात. ।।५।।
तुकोबा म्हणतात,ज्याला तू देवधर्म म्हणतोस ना तो वस्तूतः व्यापार आहे. विठोबाचे नाम हे एकच सार आहे. ।।६।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!