तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२६०९

(देव ज्याच्या ठिकाणी प्रकट होतो, त्या मनुष्याच्या बाबतीत घडणाऱ्या बदलांचे वर्णन तुकोबा ह्या अभंगातून करतात -)

देवाची ते खूण आला ज्याच्या घरा ।

त्याच्या पडे चिरा संसारासी ।।१।।

देवाची ते खूण करावे वाटोळे ।

आपणावेगळे राहो नेदी ।।२।।

देवाची ते खूण गुंतो नेदी आशा ।

ममतेंच्या फासा शिवो नेदी ।।३।।

देवाची ते खूण करावे तोंडाळ ।

आणिक सकळ जग हरी ।।४।।

देवाची ते खूण झाला ज्यासी संग ।

त्याचा झाला भंग मनुष्यपणा ।।५।।

देवाची ते खूण गुंतो नेदी वाचा ।

लागों असत्याचा मळ नेदी ।।६।।

पहा देवे तेंची बळकाविले स्थळ ।

तुक्यापें सकळ चिन्हे त्याची ।।७।।

अर्थ –
तुकोबा म्हणतात, आपल्या चांगल्या सुरू असलेल्या संसाराला तडे जाऊ लागतात, तेव्हा आपल्या घराला देव आल्याची ती खूण समजावी. ।।१।।
जेव्हा आपले वाटोळे व्हायला सुरू होते आणि देव आपल्याला त्याच्या वेगळे राहू देत नाही (म्हणजे सतत देवातच आपण मग्न राहू लागतो), तेव्हा आपल्या घराला देव आल्याची ती खूण समजावी. ।।२।।
जेव्हा आपण आशा अपेक्षांपासून दूर राहू लागतो आणि ममतेचे पाश आपल्याला स्पर्शसुद्धा करत नाहीत, ती देव घरी आल्याची खूण समजावी. ।।३।।
देव घरी आल्याची खूण ही समजावी जेव्हा माणूस फार वाचाळ बनतो आणि सतत देवाबद्दल बोलत राहतो. ।।४।।
देव घरी आल्याची खूण ही समजावी जेव्हा मनुष्याची संगत देवाशी होऊन त्याचा मनुष्यपणा (म्हणजे सुख, दुःख, मोहात अडकणारी मानवी वृत्ती) भंग पावतो. ।।५।।
देव घरी आल्याची ती खूण समजावी, जेव्हा आपल्या वाणीला असत्याचा मळ लागत नाही. (म्हणजे आपली वाणी नेहमी सत्यच बोलत राहते.) ।।६।।
तुकोबा म्हणतात, माझ्यामध्ये मला देव घरी आल्याची वरील सगळी चिन्हे दिसत आहेत आणि देवानेही नेमके तेच स्थान बळकावले आहे. ।।७।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!