तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र. ३१८२

जगी कीर्ती व्हावी ।

म्हणून झालासे गोसावी ।।१।।

बहुत केले पाठांतर ।

वर्म राहिले ते दूर ।।२।।

चित्ती नाही अनुताप ।

लटिके भगवे स्वरुप ।।३।।

तुका म्हणे शिंदळीच्या ।

व्यर्थ श्रमविली वाचा ।।४।।
अर्थ-
काही लोक हे केवळ आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे म्हणून फकीर, गोसावी बनण्याचे नाटक करतात. ।।१।।
ते लोक फार पाठांतर करतात आणि लोकांना ते शाब्दिक ज्ञान ऐकवून वाहवा मिळवतात. परंतु पाठांतराच्या नादात त्यांना अनुभूती मिळवायचे राहून जाते. ।।२।।
त्यांच्या मनात कसलाही भाव नसतो. ते केवळ खोटे रुप धारण करतात. अंगावर भगवी वस्त्रे पांघरतात आणि लोकांना फसवतात. (तुकोबांनी वापरलेला भगवी वस्त्रे हा शब्द केवळ भगवा ह्या अर्थाने न घेता तो पांढरा, हिरवा, निळा, पिवळा अशा विस्तारित अर्थाने आहे. कारण सोंग घेणारे फक्त भगवे वस्त्रेच पांघरतील असा नियम नाही.) ।।३।।
तुकोबा म्हणतात, अरे गाढवांनो तुमच्यामुळे मला माझ्या वाणीला व्यर्थ श्रमवावे लागले. ।।४।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!