तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.३४१८

सोन्याचे पर्वत करिती पाषाण ।

अवघे रानोरान कल्पतरू ।।१।।

परि या दुर्लभ विठोबाचे पाय ।

तेथे हे उपाय न सरती ।।२।।

अमृतें सागर भरविती गंगा ।

म्हणवेल उगा राहे काळा ।।३।।

भूत भविष्य कळो येईल वर्तमान ।

करवती प्रसन्न ऋद्धीसिद्धी ।।४।।

ठान मान कळो येती योगमुद्रा ।

निववेल वारा ब्रह्मांडासी ।।५।।

तुका म्हणे मोक्ष राहे आलिकडे ।

येर ती बापुडे काय तेथे ।।६।।

अर्थ –

काही लोक प्रचंड तपश्चर्या करून अशा सिद्धी मिळतात की, ते पर्वत दगडांसहित सोन्याचे करून टाकतात व सगळे जंगल कल्पतरूंचे बनवतात. ।।१।।परंतु तरीही अशा सिद्धी प्राप्त असणाऱ्यांना विठ्ठलाचे चरण बघायला मिळत नाहीत. तेथे तपश्चर्येचे हे उपाय चालत नाहीत. ।।२।।असे लोक अमृताने सागर व गंगा भरवून टाकतात. तसेच काळालाही जिंकून इच्छामरणी होतात. ।।३।।ते ऋद्धीसिद्धींना असे काही प्रसन्न करून घेतात की, त्यांना भूत वर्तमान व भविष्याचेही ज्ञान होऊ लागते. ।।४।।त्यांना योगशास्त्रातील मुद्रा व बंध समजतात. तसेच त्यांच्या सामर्थ्याने वारा सुद्धा विश्वाला शांत करतो. ।।५।।तुकोबा म्हणतात, तपश्चर्येच्या सामर्थ्याने एवढ्या अलौकिक ऋद्धी सिद्धी मिळवूनही ज्यांना पांडूरंग प्राप्त होत नाही तिथे सामान्य माणसाची काय गोष्ट ? (म्हणून ईश्वराची प्राप्ती ही केवळ भावाच्याच बळाने होते हे लक्षात घ्या.) ।।६।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!