(सदाचाराचा उपदेश प्रस्तुत अभंगातून तुकोबा करतात -)
पराविया नारी माऊली समान ।
मानिलिया धन काय वेचे ।।१।।
न करिता परनिंदा द्रव्य अभिळास ।
काय तुमचे यास वेचे सांगा ।।२।।
बैसलिया ठायी म्हणता राम राम ।
काय होय श्रम ऐसे सांगा ।।३।।
संतांचे वचनी मानिता विश्वास ।
काय तुमचे यास वेचे सांगा ।।४।।
खरे बोलता कोण लागती सायास ।
काय वेचे यास ऐसे सांगा ।।५।।
तुका म्हणे देव जोडे याचसाठी ।
आणिक ते आटी न लगे काई ।।६।।
अर्थ –
तुकोबा म्हणतात, तुम्ही परस्त्रीला आई समान मानले तर यात तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतात का ? ।।१।।
तुम्ही जर एखाद्याची निंदा केली नाही, त्याच्या धनाची अभिलाषा मनात ठेवली नाही तर असे केल्याने तुमचे काही नुकसान होते का ? ।।२।।
बसल्या जागी राम राम म्हटल्याने तुम्हाला काही कष्ट पडतात का ? ।।३।।
संतांच्या वचनावर विश्वास ठेवायला तुम्हाला काही खर्च करावा लागतो का ? ।।४।।
खरे बोलण्यासाठी कोणते काबाडकष्ट करावे लागतात ? (जर करावे लागत नाही तर मग) खरे बोलण्यात तुमचे काय नुकसान आहे ? ।।५।।
तुकोबा म्हणतात, अहो ह्याच सर्व गोष्टींसाठी देव जोडला जात असतो. ह्या गोष्टी करण्यासाठी काही खर्चावे तर लागत नाही; पण देवाचा लाभ मात्र होतो. ।।६।।