(रामनामाचा महिमा -)
अहल्या जेणे तारीली रामें ।
गणिका परलोका नेली नामें ।।१।।
रामहरे रघूराजहरे ।
रामहरे महाराजहरे ।।२।।
कंठ शीतळ जपता शूळपाणि ।
राम जपे अविनाश भवानी ।।३।।
तारकमंत्र श्रवण काशी ।
नामजपता वाल्मिक ऋषी ।।४।।
नाम जप बीजमंत्र नळा ।
सिंधू तरती ज्याच्या प्रतापे शिळा ।।५।।
नामजप जीवन मुनीजना ।
तुकयास्वामी रघूनंदना ।।६।।
अर्थ –
ज्या रामाने शिळा बनलेली अहल्या तारून नेली व गणिका पिंगलेला गती मिळवून दिली…..।।१।।
रघूकुळाचा राजा असलेल्या त्या श्रीरामाचा जयजयकार असो. ।।२।।
शंकरांनी हलाहल विष प्राशन केल्यानंतर जेव्हा त्यांच्या कंठाचा दाह होऊ लागला तेव्हा शंकरांनी रामनामाचा जप करताच तो दाह शांत झाला. अविनाशी पार्वती देखील ह्याच रामनामाचा सतत जप करत असते. ।।३।।
ह्याच तारक मंत्राचा जप केल्याने वाल्मिक ऋषींना आत्मसिद्धी प्राप्त झाली. ।।४।।
रामनाम ह्या बीजमंत्राचा नळ नावाच्या वानराने जप केल्याने त्याला राममंत्र सिद्ध झाला. त्यामुळे त्या नळाच्या हातून समुद्रात पडलेले दगड सुद्धा पाण्यावर तरंगू लागले. ।।५।।
तुकोबा म्हणतात, माझ्या स्वामी रामाचे नाम हे ऋषीमुनींसाठी तर साक्षात जीवन आहे. ।।६।।