तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र. ३६८७

उपजोनिया पुढती येऊ ।

काला खाऊ दहिभात ।।१।।

वैकुंठी तो ऐसे नाही ।

कवळ काही काल्याचे ।।२।।

एकमेंका देऊ मुखी ।

सुखी घालू हुंबरी ।।३।।

तुका म्हणे वाळवंट ।

बरवे नीट उत्तम ।।४।।
अर्थ-
(प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काल्याची स्तुती सांगत आहेत. पंच ज्ञानेन्द्रियांच्या वृत्ती म्हणजे ऐकणे, पाहणे, चव घेणे, स्पर्श अनुभवणे आणि वास ग्रहण करणे ह्यांना त्यांच्या विषयभोगापासून हटवून आत्मचिंतनात एका ठिकाणी लीन करणे ह्या अध्यात्मिक प्रक्रियेला ‘काला’ असा लौकिक शब्दप्रयोग संत वापरतात. सर्व पदार्थांना एकत्र करुन जसा काला बनतो, तशा विविध इंद्रियवृत्ती एक होऊन त्यांचा काला बनतो.)
तुकोबा म्हणतात, दहिभाताचा काला (म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांच्या वृत्तींना मेळवून तयार झालेली भक्तीरुपी वृत्ती) खाण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा पृथ्वीतलावर जन्म घेऊ. ।।१।।
असा हा काल्याचा गोड घास वैकुंठात सुद्धा खायला मिळत नाही. म्हणून आम्हाला ते वैकुंठ सुद्धा नको. ।।२।।
गोपाळ काला करण्यासाठी जमलेले आम्ही सर्वजण तो काल्याचा घास एकमेकांना भरवू आणि तृप्ततेने ढेकर देऊ. ।।३।।
तुकोबा म्हणतात, काला करण्यासाठी पंढरपूरचे वाळवंट हीच बरी, नीट आणि उत्तम अशी जागा आहे. (वाळवंट शब्दातून वासनारहित चित्ताचा निर्देश केला आहे. कारण ज्या मनात इच्छा आकांक्षा असतात, त्या मनातील वृत्ती ह्या भोगांकडे धावणाऱ्या असल्याने त्यांचे एकत्रीकरण होणे शक्य नसते.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!