तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र. ७६७

(प्रस्तुत अभंगातून तुकोबा संक्षेपाने त्यांचे आत्मचरित्र सांगतात-)

याती शूद्र वैश्य केला वेवसाव ।

आधी तो हा देव कुळपुज्य ।।१।।

नये बोलो परि पाळिले वचन ।

केलियाचा प्रश्न तुम्ही संती ।।२।।

संवसारे झालो अतिदुःखे दुःखी ।

मायबापे सेखी क्रमिलिया ।।३।।

दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान ।

स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली ।।४।।

लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे ।

वेवसाय देखे तुटी येता ।।५।।

देवाचे देऊळ होते जे भंगले ।

चित्तासी ते आले करावेसे ।।६।।

आरंभी कीर्तन करी एकादशी ।

नव्हे अभ्यासी चित्त आधी ।।७।।

काही पाठ केली संतांची उत्तरे ।

विश्वास आदरें करोनिया ।।८।।

गाती पुढे त्याचे धरावे धृपद ।

भावे चित्त शुद्ध करुनिया ।।९।।

संतांचे सेविले तीर्थ पायवणी ।

लाज नाही मनी येऊ दिली ।।१०।।

ठाकला तो काही केला परउपकार ।

केले हे शरीर कष्टऊनी ।।११।।

वचनें मानिली नाही सुहृदांची ।

समूळ प्रपंची वीट आला ।।१२।।

सत्य असत्यासी मन केले ग्वाही ।

मानियेले नाही बहुमता ।।१३।।

मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश ।

धरिला विश्वास दृढ नामी ।।१४।।

यावरी या झाली कवित्वाची स्फुर्ती ।

पाय धरिले चित्ती विठोबाचे ।।१५।।

निषेधाचा काही पडिला आघात ।

तेणे मध्यें चित्त दुखविले ।।१६।।

बुडविल्या वह्या बैसलो धरणे ।

केले नारायणे समाधान ।।१७।।

विस्तारी सांगता बहुत प्रकार ।

होईल उशीर आता पुरे ।।१८।।

आता आहे तैसा दिसतो विचार ।

पुढील प्रकार देव जाणे ।।१९।।

भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा ।

कृपावंत ऐसा कळो आले ।।२०।।

तुका म्हणे माझे सर्व भांडवल ।

बोलविले बोल पांडुरंगे ।।२१।।
अर्थ-
तुकोबा म्हणतात, मी शूद्र जातीचा असून मी वाण्याचा (दुकानदारीचा) व्यवसाय केला. मात्र आधीपासून आमच्या कुळात पांडूरंग हाच देव पुज्य होता.।।१।।
खरेतर ह्या गोष्टी बोलायला नको; पण तुम्ही संतसज्जनांनी मला माझ्या भूतकाळाबद्दल विचारले म्हणून मी हे सगळे तुम्हाला सांगतोय. ।।२।।
संसारामुळे मी अतिशय दुःखी झालो. अशातच माझे आईवडीलही मला सोडून निघून गेले. (म्हणजे त्यांचे निधन झाले.) ।।३।।
दुष्काळामुळे शेतात अन्न न पिकल्याने माझे नुकसान झाले. माझा पैसा गेला. पैसा संपल्यामुळे मला समाजात मिळणारा मानही गेला. माझी पहिली बायको तर अन्नपाण्याशिवाय मेली. ।।४।।
माझा दुकानदारीचा व्यवसाय तोट्यात जातोय हे बघून मला स्वतःचीच फार लाज वाटली आणि मी दुःखी झालो. ।।५।।
आमचे एक देवाचे देऊळ होते, जे भंगलेले होते. त्याचा जिर्णोद्धार करावा असे मला वाटले. ।।६।।
मी सुरुवातीला पांडुरंगाचे कीर्तन करायचो आणि एकादशीचा उपवास करायचो. सुरुवातीला साधनेमध्ये माझे मन लागत नव्हते. ।।७।।
मी आवडीने संतांनी सांगितलेली काही वचने अत्यंत आदराने पाठ करुन ठेवली. ।।८।।
जेव्हा लोक कीर्तन करायचे, भजन म्हणायचे, भगवंताचे गीत गायचे तेव्हा मला ते गीत पाठ नसल्याने पूर्ण म्हणता येत नव्हते. म्हणून मी त्या गीतातील फक्त धृवपदच म्हणायचो. परंतु तसे करतानाही माझ्या मनातील भाव मात्र शुद्ध होता. ।।९।।
मी संतांच्या चरणांचे तीर्थ प्राशन करताना मनात कधीही लाज बाळगली नाही. ।।१०।।
जेव्हा कधी उपकार करण्याची संधी मला मिळाली तेव्हा मी ती कधीही दवडली नाही. मी परोपकार करतच राहिलो. त्यासाठी मी प्रसंगी माझ्या शरीरालाही कष्ट दिले. ।।११।।
मला माझ्या जीवालगांनी, मित्रांनी तसेच इतरही लोकांनी संसार सुखाने करण्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. परंतु मी त्यांच्या गोष्टी कधीही ऐकल्या नाहीत. कारण मुळातच प्रपंचातून माझे मन विटले होते. ।।१२।।
सत्य असत्याचा निर्णय करण्यासाठी मी बहुसंख्य लोकांचे मत काय आहे, याला महत्त्व न देता माझ्या मनालाच सत्य असत्याचा साक्षीदार बनवले. ।।१३।।
स्वप्नात येऊन गुरुंनी (म्हणजे बाबाजी चैतन्यांनी) मला जो उपदेश केला तोच मी सत्य मानला आणि त्याच उपदेशाला अनुसरुन भगवंताच्या नामस्मरणात दृढ श्रद्धा ठेवली. ।।१४।।
गुरुवचन आणि नामस्मरण यावर दृढ श्रद्धा ठेवल्यांनतर मग मला कवित्वाची (अभंग रचनेची) स्फुर्ती प्राप्त झाली. मी विठ्ठलाचे पाय माझ्या चित्तात धरुन ठेवले. ।।१५।।
अशा रितीने भगवंताची भक्ती करत असताना माझ्यावर निषेधाचा आघात झाला. (कारण मी जातीने शूद्र असल्याने भगवंताची भक्ती करण्याचा, काव्यरचनेचा, ज्ञानप्राप्तीचा व वेदांचा अर्थ जाणण्याचा मला अधिकार नव्हता.) त्यामुळे माझे मन प्रचंड दुःखी झाले.।।१६।।
(मला काव्यरचनेची स्फुर्ती होऊन मी अनुभवाच्या आधारे वेदांमधील गुह्य अभंगातून मांडले खरे, परंतु मी शूद्र असल्याने धर्माज्ञेनुसार मला अभंग करण्याचा अधिकार नव्हता. पण तरीही मी अभंग लिहिले. म्हणून) धर्माच्या ठेकेदारांनी माझ्या अभंगाच्या वह्या नदीच्या डोहात बुडवल्या. तेव्हा वह्या पुन्हा मिळवण्यासाठी मी देवाकडे धरणे (आंदोलन) धरुन बसलो. तेव्हा नारायणाने माझ्या वह्या पाण्याबाहेर कोरड्या काढून माझे समाधान केले. ।।१७।।
थोडक्यात हे सगळे असे आहे. हे सगळे जर मी विस्ताराने सांगत बसलो तर फार उशीर होईल. म्हणून मी आवरते घेतो. ।।१८।।
आता जशी स्थिती आहे, तसेच करण्याचा माझा विचार आहे. पुढे जे काही होईल ते देवालाच माहित. ।।१९।।
एक मात्र माझ्या अनुभवाला चांगले आले, ते म्हणजे देव हा अत्यंत कृपाळू असून तो त्याच्या भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही. ।।२०।।
तुकोबा म्हणतात, मी जे काही बोललो, भगवंताचे नाम घेतले आणि कीर्तन केले, हेच माझे भांडवल आहे व ते मी बोललेले सुद्धा खरेतर पांडुरंगानेच माझ्याकडून वदवून घेतलेले आहे. ।।२१।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!