तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.९४७

(पाखंड / नास्तिक / चार्वाक मताचे खंडन -)

जीव तोचि देव भोजन ते भक्ती ।

मरण ते मुक्ती पाखांड्याची ।।१।।

पिंडाच्या पोषके नागविले जन ।

लटिकें पुराण वेद केले ।।२।।

मना आला तैसा करिती विचार ।

म्हणती संसार नाही पुन्हा ।।३।।

तुका म्हणे पाठीं उडती यमदंड ।

पापपुण्य लंड न विचारिती ।।४।।
अर्थ –
पाखंडी लोकांसाठी त्यांचा स्वतःचा जीव हाच देव असतो, जेवण करणे हीच त्यांची भक्ती असते (म्हणजे नेहमी काहीतरी खात राहावे असे त्यांना वाटते) आणि मरणे हीच मुक्ती असल्यासारखे त्यांना वाटते।।१।।
असे पाखंडी लोक त्यांचे शरीर पोसण्याकरीता प्रसंगी इतरांनाही उपद्रव देतात. वेद, पुराणांमध्ये सांगितलेला इंद्रियसंयम, आहार नियंत्रण आणि ईश्वरी तत्त्वज्ञान हे सगळे खोटे असून इंद्रियांचे भोग हेच खरे आहेत, असे ते लोकांना सांगतात. ।।२।।
त्यांच्या मनात एखादा विचार आला तर तोच खरा असे ते त्यांना वाटते (यालाच ते बुद्धी किंवा तर्क असे नाव देतात) आणि हा संसार एकदाच उपभोगायला मिळतो, म्हणून याचा आनंद घ्या असे ते म्हणतात. ।।३।।
तुकोबा म्हणतात, पापपुण्याचा विचार न करणाऱ्या अशा ह्या पाखंडी लोकांच्या पाठीवर मेल्यानंतर मात्र यमाचे दांडके पडतात. ।।४।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!