तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र. ९५८

(ह्या अभंगातून तुकोबा नामाचा महिमा सांगतात -)

नामाचे पवाडे बोलती पुराणें ।

होऊनि कीर्तने तोचि ठेला ।।१।।

आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र ।

आवडीचे स्तोत्र सदा घोकी ।।२।।

आगळे हे सार उत्तमा उत्तम ।

ब्रह्मकर्मा नाम एक तुझें ।।३।।

तिही त्रिभुवनी गमन नारदा ।

हाती विणा सदा नाम मुखी ।।४।।

परिक्षिती मृत्यु सात दिवसांचा ।

मुक्त जाला वाचा उच्चारिता ।।५।।

कोळियाची कीर्ती वाढली गहन ।

केलें रामायण रामाआधी ।।६।।

सगुण निर्गुण तुज म्हणे वेद ।

तुका म्हणे भेद नाही नामी ।।७।।
अर्थ-
तुकोबा म्हणतात, भगवंताच्या नामाचे पोवाडे पुराणांनी सुद्धा गायले आहे. आपण सुद्धा नामस्मरणाचे कीर्तन केले म्हणजे त्याच्याशी एकरुप होता येते. ।।१।।
आदिनाथ शंकरांच्या तोंडी रामनाम हा मंत्र नेहमी असतो. रामनाम हेच त्यांच्या आवडीचे स्तोत्र असून ते स्तोत्र महादेव नेहमी घोकत असतात. ।।२।।
असे हे आगळेवेगळे (रामनाम) सर्व मंत्रांचे सार असून जे ब्रह्मकर्म आहे त्यालाही देवा ! तुझ्याच नावाने ओळखले जाते. ।।३।।
त्रिभुवनात गमन करण्याची सिद्धी ज्या नारदाला प्राप्त आहे, तो सुद्धा सदासर्वकाळ हातात वीणा घेऊन नारायण असे नाम उच्चारत असतो. ।।४।।
परिक्षित राजाचा मृत्यु सात दिवसांत होणार होता. त्या सात दिवसांत परिक्षिताने तुझे नामस्मरण केले आणि तो मुक्त झाला. ।।५।।
रामनामामुळे जो पुर्वाश्रमीचा वाल्या कोळी होता, त्याची कीर्ती अनंत वाढली. त्याच वाल्या कोळ्याने नामस्मरणाच्या शक्तीने रामाआधीच रामायण लिहिले. ।।६।।
तुकोबा म्हणतात, देवा ! वेद तुझे वर्णन सगूण आणि निर्गुण अशा दोन्हीही भेदपद्धतीने करतात, मात्र तुझ्या नामात कसलाही भेद नसल्याचे मला दिसते. ।।७।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!