तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.१६७

(आत्मस्वरुपाची अनुभूती असणारा आणि त्याचे नुसतेच सोंग घेणारा यातील फरक तुकोबांनी ह्या अभंगातून सांगितला आहे.)

एक तटस्थ मानसी ।

एक सहजचि आळसी ।।१।।

दोन्ही दिसती सारखी ।

वर्म जाणे तो पारखी ।।२।।

एक ध्यान करिती जप ।

एक बैसूनि घेती झोप ।।३।।

एका सर्वस्वाचा त्याग ।

एका पोटासाठी जोग ।।४।।

एका भक्ती पोटासाठी ।

एका देवासवें भेटी ।।५।।

वर्म पोटी एका ।

फळे दोन सांगे तुका ।।६।।
अर्थ –
आत्मस्वरुपात तल्लीन झाल्याने विरक्ती आलेला मनुष्य काहीही न करता स्वस्थ बसून राहतो आणि दुसरा आळशी असलेला मनुष्यही तसाच स्वस्थ बसून राहतो. ।।१।।
असे हे दोन्हीही मनुष्य वरवर सारखेच (उदासीन) दिसतात. परंतु ह्या उदासीनतेचे खरे वर्म पारखी मनुष्यालाच कळते. ।।२।।
एक जो आत्मसाक्षात्कारी असतो तो ध्यानस्थ बसून ईश्वराचे स्मरण करत असतो; तर दुसरा अगदी तसेच बसून झोप घेत असतो. ।।३।।
एकाने ईश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो तर दुसऱ्याचा जोग (देवधर्म) हा केवळ पोटासाठी असतो. ।।४।।
एकाची भक्ती ही केवळ पोटासाठी असते तर दुसऱ्याची भक्ती ही देवासाठी असते. ।।५।।
तुकोबा म्हणतात, वरवर सारख्या दिसणाऱ्या दोन क्रियांची फळे मात्र एकसारखी न राहता दोन भिन्न भिन्न प्रकारची असतात. ।।६।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!