विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें।येरांनीं वहावें भार माथां॥ १ ॥
साधन संकट सर्वांलागीं शीण। व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥२॥
भाव हा कठिण वज्र हें भेदवे । परि न छेदवे माया-जाळ॥३॥
तुका म्हणे वर्म भजनेंचि सांपडें । येरासी तो पडें वोस दिशा॥४॥
सर्व जग विष्णुमय आहे. असा साक्षात्कार केवळ वैष्णवांना होता. बाकीचे सारे जग नाशवंत म्हणजे असत्य आहे. अशा ज्ञानाचा भार वहात असतात. ॥१॥ मोक्षप्राप्तीची जप तपादी, देह दंड, इत्यादी साधने कष्टदायक आहेत. व्यर्थ परिश्रम आहेत. देहाभिमान नष्ट झाला पाहिजे. अहंकाराचा नाश होणे हीच मोठी साधना आहे.॥२॥‘विष्णुमय जग’ हा भाव अंतरी ठसावला की इंद्राचे कठीण वज्र भेदले जाईल पण इतर साधनांनी सामान्य मायाजाळ भेदणे कठीण आहे.।।३।। तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय सर्व हा भाव वैष्णवाना भजनातच सहज सापडतो.इतराना मात्र सर्वदिशा विष्णुविना ओस वाटतात.॥४॥