अज्ञानामुळे आपले स्व स्वरूपास आपण इतके पारखे होतो व भलत्याच मार्गावर जातो. सुदैवाने सद्गुरू कृपेने आणि ईश्वरी कृपेने देवायन पंथावर आल्यावर व आत्मरामायाचे पूर्ण दर्शन झाल्यावर साधकास केव्हढा आनंद होत असेल याचे वर्णन करणे अशक्य आहे.

ज्या सगुण मूर्तीचे ध्यानाने वा नामस्मरणाने संपूर्ण मनोलय प्राप्त होऊन त्याचा शेवट आत्मस्वरूपाचे दर्शनात झाला त्या आत्म्यासच आपले साधुसंत, भक्तीचा जिव्हाळा ठेवण्याकरिता, विठ्ठल, कृष्ण, राम, वासुदेव वैगेरे नामांनी संबोधितात. आपल्या उपासानेप्रमाणे सगुण नामास घेतलेल्या उपास्य देवताचे नाम ते आत्म्यास देतात.

कृष्ण विष्णू हरी गोविंद!
या नामाचे निखिल प्रबंध!! – ज्ञानेश्वर

लोकांनी ईश्वरावर श्रद्धा ठेवावी, त्याचीच भक्ती करावी, त्याचे भजन, पूजन,जप, ध्यान करावे. आणि शेवटी आत्म कल्याण करून घ्यावे. म्हणून आत्मा हाच उपास्य दैवत आणि उपास्य दैवत हाच आत्मा ही अंतःकरण यात जागृती ठेवून त्या दृष्टीने ध्यान, नामस्मरण पूजन आदी करावे.

आत्मारामाचे दर्शन झाल्याने आनंदात मग्न झाले असता आत्मा हाच सगुण देव आहे असे स्पष्ट उदगार संताच्या मुखातून कसे निघाले ते स्पष्ट करण्यास हे वचन आहे-

अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती! मुळी जी होती आच्छादली ||
भावाचे मथले निर्गुण संचले! ते हे उभे केले विटेवेरी||
अमूर्त मूर्त मधुसूदन| समचरण देखियले||
-संत तुकाराम

विठ्ठलचरणी स्थिरावलेल्या मनातला तो अंतिम मुक्तीचा क्षण अनुभवाला येतो, त्याक्षणी त्या जीवनमुक्त आनंदाचा संबंध प्रकाशाशीच जोडला जातो. ‘पाजळला दीपु। फिटला अंधकारु वो’. हाच खरा प्रकाशोत्सव! प्रत्येक संतमन हेच सांगून जाते.