“कोणी ‘श्रीराम’ म्हणतो कोणी ‘राम’ असे का?

“भजगोविन्दं भजगोविन्दं, गोविन्दं भजमूढमते।
नामस्मरणादन्यमुपायं, नहि पश्यामो भवतरणे॥” :- आदी शंकराचार्य.

नामाचे महत्त्व सांगणारे हे अमृतवचन आठवण्यामागील कारण असे की मध्यंतरी एका चांगल्या साधकाने व्हॉटसअपवर संवाद साधताना विचारले, “कोणी ‘श्रीराम’ म्हणतो कोणी ‘राम’ असे का?
तसेच ‘श्रीराम….. जय जय राम’ या मंत्रात, आधी ‘श्रीराम’ म्हंटले आहे आणि नंतर ‘राम’ असे का?”

श्री कृपेने त्यांना जे कळवले ते असे;
“मला कोणी सुनिल म्हणते, कोणी काका, कोणी दादा, तर मुलगी बाबा म्हणते. पण मी तीच व्यक्ती आहे, एकच.
तसेच कोणी ‘श्रीराम’ म्हणेल कोणी ‘राम’, त्याने काही फरक पडत नाही.
मी श्रींना कधी ‘माऊली’ म्हणतो, कधी ‘माय’ आणि लिहिताना ‘श्री’. हे माझ्या त्या त्या वेळेच्या भावनेवर अवलंबून आहे. तसेच इथे आहे.
पण एक गोष्ट सांगतो आपल्याला जो गुरुमंत्र मिळाला असेल त्यात कधीही बदल करून जप करू नये; स्वप्नातदेखील.
उदाहणादाखल; ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा मंत्र मिळाला आहे तर त्याला सुरवातीला ‘ॐ’ वगैरे लावून म्हणू नये. सद्गुरूंनी केवळ एकच अक्षर मंत्र म्हणून जरी दिला तरी त्यात एवढी असीम शक्ती असते की आपल्याला नराचा नारायण करून टाकते.
‘गुरु को कीजै दण्डवत, कोटि कोटि परनाम।
कीट ना जाने भ्रूंग को, गुरु करिले आप समान॥’ :- संत कबीर.

तसेच आपला दुसरा प्रश्न;
‘श्रीराम….. जयजयराम’ या मंत्रात, आधी ‘श्रीराम’ म्हंटले आहे आणि नंतर ‘राम’ असे का?”
त्याच उत्तर असं;
‘श्रीराम जयराम जय जय राम’ असा मंत्र नसून
‘श्रीराम जयराम जयजयराम’ असा मंत्र आहे. शेवटी नुसते ‘राम’ नाही, तर ‘जयजयराम’ आहे.”
असो!

आता आपण या अद्भुत त्रयोदशाक्षरी मंत्राचा श्रींनी डॉक्टर कुर्तकोटी यांना सांगितलेला गुह्यार्थ बघू ;
‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा तारक मंत्र आहे कारण तो सिद्ध मंत्र आहे. हा मंत्र गुरुरुप आहे.
श्रीरामाने हा मंत्र फक्त दोघांनाच दिला. एक सीतामाईला व हनुमंताला. हनुमंताकडून तो परंपरेने श्रींकडे आला.
श्री याचे दोन अर्थ करीत. सिध्दाचा अर्थ आणि साधकाचा अर्थ.
‘मी रामस्वरूप आहे’ हा साक्षात्कार हा सिध्दाचा अर्थ आणि ‘राम माझा स्वामी आहे’, ‘रक्षणकर्ता आहे’, ‘माझ्या हृदयात आहे’ ही निष्ठा हा साधकाचा अर्थ.

‘श्रीराम जयराम जयजयराम’ या मंत्रातील शब्दांचा अर्थ श्री असा करीत;
‘श्रीराम’ म्हणजे ‘पुरषोत्तम’ म्हणजे ‘सगुण आणि निर्गुण परमात्मा.’ सगुण परमात्मा म्हणजे नाम रूपांनी गजबजलेले दृश्य विश्व. निर्गुण परमात्मा म्हणजे त्या विश्वाचे सत्तारूप सूक्ष्म अधिष्ठान.
‘जयराम’ म्हणजे जेथे तेथे त्या पुरषोत्तमाचाच जय आहे कारण तोच खरा कर्ता असल्याने त्याच्या इच्छेने, त्याच्या संकल्पाने सर्व विश्व जगते, हालते व चालते. त्याची शक्ती सर्व घडामोडींमधे काम करते, चालते.
‘जयजयराम’ ह्याचा अर्थ सोपा आहे. परमात्मा आतबाहेर कल्याणमय आहे. त्याची शक्ती जे घडवून आणते ते पूर्ण कल्याणचेच असते. म्हणून घडोघडी घडणाऱ्या घटनांमधे कल्याणाचीच कल्पना करावी आणि परमात्म्याचा जयजयकार करावा.
असो!

श्रीकृपेने आता आपल्याला मंत्र तर मिळाला आहे. मग आपण श्रींनी (आपापल्या सदगुरुंनी) आपल्याला मंत्र देण्यामागील गुह्यार्थ बघू;

श्रींनी मंत्र देणं हे आईने अत्यंत ममतेने बाळाला स्तनपान करवण्यासारखं आहे; त्याची भूक भागवण्यासाठी, त्याच्या उत्तम वाढीसाठी, सुदृढ आरोग्यासाठी. मातेपेक्षाही अधिक ममतेने, श्री आपल्याला, त्यांच्या बाळाला, लेकराला दिव्य नामाचं स्तनपान करवतात; आपल्या आत्म्याची भूक भागवण्यासाठी, आपल्या आत्मिक उन्नतीसाठी, सुदृढ अध्यात्मिक आरोग्यासाठी. बाळाला दुग्धपान करवण्यात जसं मातेच वात्सल्य ओसंडून जात असतं त्याच्या हजारो-लाखोपट वात्सल्य आपल्याला नामरुपी दुग्धपान करवताना आपल्या माऊलीचं ओसंडून जात असतं. म्हणून संतांच्या या असीम प्रेमाचे वर्णन करताना तुकोबा म्हणतात;
“लेकुराचें हित। जाणे (वाहें) माउलीचें चित्त॥
ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीति॥
पोटीं भार वाहे। त्याचें सर्वस्वही साहे॥
तुका म्हणे माझें। तुम्हा संतांवरी ओझें॥” ११४०
जसं ते बाळ कधी बाळसं धरेल असं प्रेमाने मातेला होतं, त्याहीपेक्षा शतपट प्रेम जागृत होऊन आपण परमार्थाचं बाळसं कधी धरू असं त्यांना होत. खरं म्हणजे मुलाने आईला लाथा मारू नये; पण पिताना ते बाळ कधी-कधी आईला लाथाही मारतं, पण तिला त्याचं अधिकच कौतुक वाटून प्रेमाचं भरतं येतं, तसे आपण जेव्हा त्यांच्या आज्ञेचा अव्हेर करतो, मनमानी करतो, विषय-वासनारुपी चिखलात पुनःपुन्हा लोळतो, तेंव्हा आपण अज्ञानी आहोत याची जाण असलेल्या त्या दयासिंधू जगत्जननीला त्यांनी आपल्याला अनुग्रह देऊन आपल म्हटलं असल्याने व आपण थोडंका होईना नाम घेतो म्हणून त्या आईसारखंच होतं व आपलं किती करू आणि किती नको असं होऊन जातं.
‘काय नाहीं माता गौरवीत बाळा। काय नाहीं लळा पाळीत ते॥
काय नाहीं त्याची करीत ते सेवा। काय नाहीं जीवा गोमटे ते॥
अमंगळपणें कंटाळा न धरी। उचलोनी करीं कंठीं लावी॥
लेववी आपुले अंगें अळंकार। संतोषा ये फार देखोनियां॥’ २०६१
लेकराच्या आजारपणात त्याच हगणे, मुतणे काढणारे दोनच; पैसा घेऊन करणारी दाई आणि दुसरी आई. श्रींचा तर पैश्याशी काही संबंध नाही. म्हणूनच वात्सल्यमूर्ती असलेल्या श्रींना आपण विषयाच्या घाणीत डबडबलेले कसं पहावेल सांगा?
“मातेची अवस्था काय जाणे बाळ। तिसी तों सकळ चिंता त्याची॥’ २५५७
त्या प्रेमापोटीच, वात्सल्यापोटीच श्री आपल्याला नाम देतात, जे नाम आपला विवेक जागृत करून व वैराग्याची मुहूर्तमेढ रोवुन आपल्याला विषय-वासनांच्या घाणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.
ईश्वर बनून गौरीशिखरावर विराजमान होण्याची आपली पात्रता असून देखील आपण किड्या-मुंगीसारखे क्षुद्र जीवन जगत आहोत ह्याचा बोध, समज, जाण करून देणे ही विवेक-जागृती.
आणि वैराग्याची मुहूर्तमेढ म्हणजे संसार असार आहे, भ्रामक आहे, दुःखदायक आहे, ह्या भावनेचे बीजारोपण.
हे वैराग्य असं असतं की मंदिरापाशी, झाडाखाली, उघड्यावर, जमिनीवर गगनाखाली, पृथ्वी हीच शय्या, अश्या अवस्थेत एकांतात राहून सर्वसंगपरित्याग करून देखील आनंदमय जीवन जगणे.
“मंदिर तरु मूल निवासः, शय्या भूतलमजिनं वासः।
सर्व परिग्रह भोग त्यागः, कस्य सुखं न करोति विरागः॥” :- आदी शंकराचार्य.
असो!

एक अश्रद्ध प्रोफेसर श्रींपाशी येई व अनेक विषयांवर चर्चा करी. एकदा श्रींना न मागताच मिळत असलेल्या मेवा-मिठाईचा विषय निघाल्यावर श्रींनी त्याला प्रारब्धाचा सिद्धांत सांगितला. तो काही त्याला पटला नाही. तेंव्हा जरा रागावूनच श्री त्याला म्हणाले, “आमच्यासारख्या गोसाव्यापुढे मेवा-मिठाई येते याचं तुम्हाला वैषम्य वाटत. जरा धाडस करा आणि मग बघा काय होतं ते!”
झालं, तो नोकरी सोडून रामप्राप्तीसाठी निघून गेला. हे वैराग्य. सोनारानेच कान टोचावे लागतात; अर्थात कान टोचणारा सोनार, श्री होते.
असो!

तर एकदाका विवेक-वैराग्य जागृत झालं की कमल पत्रावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणेच जीवनाचे असलेले क्षणभंगुर स्वरूप लक्षात येते.
“नलिनीदलगतजलमतितरलम्, तद्वज्जीवितमतिशयचपलम्।” :- आदी शंकराचार्य.
अशाश्वत संसाराची खरी ओळख झाल्याने आपणांस शाश्वत सद्वस्तूची ओढ लागून आपली अवस्था तुकाराम महाराजांसारखी होते;
“मातेविण बाळा। आणीक न माने सोहळा॥
तैसें झालें माझ्या चित्ता। तुजविण पंढरिनाथा॥
वाट पाहे मेघा बिंदू। नेघे चातक सरिता सिंधू॥
सारसांसी निशीं। ध्यान रवीच्या प्रकाशीं॥
जीवनाविण मत्स्य। जैसें धेनुलागीं वत्स॥
पतिव्रते जिणें। भ्रताराच्या वर्तमानें॥
कृपणाचे धन। लोभा (भ्या) लागीं जैसें मन॥
तुका म्हणे काय। तुजविण प्राण राहे॥” १२१८
ह्या तळमळीचे पर्यवसान म्हणजे चिरंतन समाधानरुपी अमृत पिण्यासाठी आपली धडपड चालू होते, इंद्रियांच्या भुकेपेक्षा आत्म्याची भूक भागवण्याची आपणांस आस निर्माण होते आणि आपण शाश्वत नामाच्या राजमार्गाकडे आकर्षित होतो. ते पुनःपुन्हा, अखंड, अविरत घ्यावं आणि त्यात डुबून जावं असं आपल्याला वाटत. सुरवातीला आकर्षण म्हणून म्हणा, गरज म्हणून म्हणा, फलाशेने म्हणा, किंवा कर्तव्य म्हणून घेत असलेल्या नामात हळूहळू प्रेम निर्माण होतं. एकदाका ते घेण्यातील यांत्रिकपणा निघून गेला की त्यात नित्य नवा आनंद दिसू लागतो. त्यातील अवीट गोडीची भूक लागून, सदगुरु चरणांशिवाय कशातही रस वाटत नाही.
“सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती। रखुमाईच्या पती सोयरिया॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम। देई मज प्रेम सर्व काळ॥
विठो माऊलिये हाची वर देई। संचरोनि राहीं हृदयामाजीं॥
तुका म्हणे काहीं न मागें आणिक। तुझे पायीं सुख सर्व आहे॥” ३
अशी अवस्था होऊन नामात सदगुरुंचे अस्तित्व जाणवू लागते. जसं जसं ते अखंड चालेल तसं तसं…..
“जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती। चालविसी हाती धरुनियां॥
चालों वाटें आम्ही तुझाचि आधार। चालविसी भार सवें माझा॥” १३०७
असा अनुभव येऊ लागून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव अखंड राहते. ‘ते आहेतच’ या अनुभवात आपल्या मीपणाचा विसर पडतो. त्यांच्या अस्तित्वात आपले अस्तित्व कधी विलीन होते याचा पत्ताच लागत नाही. एखाद्या माऊलीप्रमाणे त्यांचं आपल्या जीवनावर, हेच कशाला आपल्या प्रत्येक विचारावर, कृतीवर पूर्ण लक्ष आहे ह्याची खात्री पटते. ते आपल्याला सांभाळतात, नव्हे नव्हे तेच आपल्या जीवनाचे कर्ते-करविते असून आपण केवळ निमित्तमात्र आहोत ह्याची खात्री पटते. ह्या खात्रीमागे दडले असते संपूर्ण समर्पण, असीम शरणागती. एकदाका खरी शरणागती साधली की अर्धी लढाई जिंकली. कारण शरणागताला प्रारब्ध उरत नाही. त्याचं आयुष्य त्याचं राहत नाही. तो मनाने सदगुरुंत समरस होऊन जातो; पाण्यात साखर अथवा मीठ विरघळावं तसं.
“तन मन धन दिलें पंढरिराया। आतां सांगावया उरलें नाही॥
अर्थ (आर्त) चाड चिंता नाहिं मनीं आशा। तोडियेला फांसा उपाधीचा॥
तुका म्हणे एक विठोबाचें नाम। आहे जवळी दाम नाहीं रुका॥” ३०५७
त्याच्या जीवनाचे श्री सूत्रधार बनतात आणि त्यालादेखील त्यांच्या हातातील कळसुत्री बाहुले बनण्यात आनंद मिळतो; कारण ह्यासारखं भाग्य करोडो रुपये देऊनदेखील कोणी विकत घेऊ शकत नाही. ते त्याचं पूर्व सुकृतच असतं. मोठ्या भाग्याने लाभलेल्या या संधीचा फायदा करून घ्यावा यासाठी त्याची तळमळ चालू होते. प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी जगावा, त्यांच्या अनुसंधानात व्यतीत व्हावा अशी त्याची मनीषा असते. प्रत्येक इंद्रियांना त्यांची ओढ निर्माण व्हावी व तीदेखील नामात रंगून जावीत अशी त्यांस आस निर्माण होते. त्याच्या जीवनाची तीच इतिकर्तव्यता राहते.
‘घेई घेई माझे वाचे। गोड नाम विठोबाचें॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख। पाहा विठोबाचें मुख॥ तुम्ही ऐका रे कान। माझ्या विठोबाचे गुण॥
मना तेथें धांव घेई। राहें विठोबाचे पायी॥
तुका म्हणे जीवा। नको सोडूं या केशवा॥’३७२
दिवसरात्र तो श्रींसाठी काय करता येईल, त्यांना कसं प्रसन्न राखता येईल, त्यांना न आवडणारी गोष्ट, विषय-विकार कसे टाळता येतील ह्याच विचारात असतो व नामाच्या, शरणागतीच्या योगाने त्यात तो यशस्वीदेखील होतो.
“तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें। काम क्रोधें केलें घर रितें॥” ३९४२
विकारांवर ताबा आल्याने त्याचे हवे-नकोपण जाते व “सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।” अशी स्थितप्रज्ञाची अवस्था त्यांस प्राप्त होते. तो कासवाप्रमाणे योग्यवेळी आपले अवयव आत घेतो (आवरून घेतो).
“जैसा हर्षला कासव। सोडी मोकळे अवयव॥
इच्छावशें आवरोन। घेई आपुले आपण॥
तैसी़ सर्व इंद्रियें तीं। ज्याच्या आज्ञेंत वागती॥
ज्याचीं इंद्रियें स्वाधीन। तो चि स्थितप्रज्ञ जाण॥” :- श्री स्वामी स्वरुपानंद.
त्याचा देह सांसारिक गोष्टीत असतो, पण मनाचा ताबा केवळ त्यांनीच घेतलेला असतो, त्याच्या जीवनावर केवळ त्यांचाच अधिकार राहतो आणि हे त्याच्या जवळच्यांना चागलेच लक्षात येते. त्याच्या मनातील अंतर्गत कप्पा केवळ आणि केवळ श्रींसाठीच असतो; त्यात इतरांना, इतर विचारांना जागा नसते, अटकाव असतो. त्यांचं थोडं जरी अनुसंधान चुकलं तरी त्याचा जीव कासावीस होतो. ‘अश्या जगण्यापेक्षा मरण पत्करले’ असं त्यास वाटतं. त्याच्या जीवनाचा दुसरा काही हेतूच राहत नाही. जगावं तर त्यांच्यासाठी आणि मरावं तर त्यांच्याच कुशीत हेच त्याचं ध्येय असतं. त्याची मरणाची भीती पूर्णपणे गेलेली असते; भाऊसाहेबांच्यासारखी.

नव्वदीच्या पुढे गेलेल्या भाऊसाहेबांना एकदा प. पू. बाबांनी विचारलं, “भाऊ आपल्याला मरणाची भीती वाटते का?” त्यावर डोक्यावर हात फिरवून ते म्हणाले, “भीति कसली? इथे आहे तरी श्री बरोबर आहेत, आणि मेलो तरी इथून उठून त्यांच्याचकडेच जायचं! मग भीति कसली?”
हेच साधायचं आहे आपल्याला.
“याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा॥”
त्यासाठीच हे नाम घेणं, अनुग्रह घेणं आहे; काळावर सत्ता गाजवण्यासाठी. काळाने आपल्यापुढे हांजी-हांजी करावयांस हवी. यमराज (काळ) घ्यायला आले तर निर्भयपणे सांगता आलं पाहिजे, “थांबा माझा नित्याचा जप राहिला आहे.” किंवा असं सांगता आलं पाहिजे, “माफ करा, तुमच्याबरोबर येणार नाही! श्रींबरोबरच जाईन. ते स्वतः मला घ्यायला येणार आहेत. मी त्यांचं लेकरू त्यांच्याच कडेवर बसणार आणि ते नेतील तिथेच जाणार.”
ही, अशी बावनकशी निष्ठा असेल तर माऊलीला आपल्याला घ्यायला यावच लागेल. अहो ते वाटच बघत असतात की लाखो-करोडो शिष्यांत एकतरी असा निघावा; संपूर्ण शरणागतीचा महासागर, निष्ठेचा महामेरू. त्यांच्या बुवासारखा; ब्रह्मानंद महाराजांसारखा.
असा भक्त प्रत्येक गोष्टीत ‘श्रींची कृपा’ बघत असतो; लौकिकदृष्ट्या अवांछित असली तरी.
ब्रह्मानंद महाराजांच्या अंगावर कोड होतं, म्हणून श्री म्हणाले, “ते बरं करू का?” तर बुवा म्हणाले, नको महाराज, “ते परमार्थाला आवरण आहे. त्यामुळे देहावरिल प्रेम कमी होण्यास मदतच झाली.”
अश्या भक्ताच्याबाबतीत काही अनिष्ट घडले तरी त्यात त्याला त्यांची कृपाच दिसते, त्यांचा प्रसाद आहे म्हणून तो ते अत्यंत आनंदाने ग्रहण करतो. अर्थात कालांतराने त्याचं योग्य ते फळ त्याला श्रींकडून जरूर मिळतं; अवर्णनातीत, अतुलनीय, असंभवनीय, अलौकिक.
दत्ताकाका एक बोधकथा सांगत;
“एक राजा होता. एकदा ऐन दरबारात सहज खंजीराची धार तपासत असताना अनवधनाने त्याची करंगळी कापली गेली. सर्वजण हळहळले. पण श्रींचा अनुग्रहित प्रधान म्हणाला, “श्रींची कृपा झाली.” प्रधानाची प्रतिक्रिया ऐकुन राजा चिडला आणि सैनिकांना आज्ञा केली, “याला आत्ताच्याआत्ता तुरुंगात टाका.” जसे सैनिक प्रधानाला घेऊन जाऊ लागले, तसे तो पुन्हा म्हणाला, “श्रींची कृपा झाली.”
काही दिवसांनी राजा आणि काही सैनिक शिकारीसाठी जंगलात गेले. परंतु राजा व त्यांची चुकामूक होऊन राजा खोल जंगलात रस्ता चुकला. होताहोता संध्याकाळ झाली, व राजा तहान-भुकेने अत्यंत व्याकुळ झाला. तेवढ्यात त्याला थोड्या अंतरावर मंद प्रकाशात काही झोपड्या दिसल्याने त्याने घोडा तिकडे वळवला. ती आदिवासी लोकांची वस्ती होती. राजाला बघून त्या लोकांनी राजाचे उत्साहाने स्वागत करून त्याला एका झोपडीत न्हेऊन त्याच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था अत्यंत उत्तम केली व त्यास विश्रांती घ्यावयास सांगितले. आता झोपडीत राजा एकटाच होता व त्याच्या असे नजरेस आले की त्या लोकांची काहीतरी पूजापाठ, होमहवन करण्याची तयारी चालू आहे. तेवढ्यात राजाच्या कानी काही कुजबुजणे आले. जेव्हा लक्ष केंद्रित केले तेंव्हा त्याने ऐकले की झोपडीबाहेर एक आदिवासी दुसऱ्याला सांगत होता, “आज अमावस्या असल्याने देवीला बळी द्यायचा आहे, तरी ह्या राजबिंड्या माणसाला बळी देण्याचा आपल्या सरदाराचा विचार आहे.” राजा घाबरला. तेवढ्यात त्यांच्यापैकी एक बुजुर्ग तेथे आला आणि त्यांना म्हणाला, “अरे जा त्या माणसाला नीट तपासा, त्याच्यात काही व्यंग तर नाही, ते बघा.” तसे ते दोघे राजाजवळ आले व त्यांनी तपासले असता राजास करंगळी नसल्याचे आढळले. तसे त्यांनी त्या बुजुर्ग व्यक्तीस सांगताच तो म्हणाला, “व्यंग असलेला माणूस बळी म्हणून चालणार नाही. त्याला सोडून द्या.” त्या दोघांनी राजाला जंगलाच्या बाहेर सोडले व दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या नगरीत येताच प्रथम त्याने प्रधानाला तुरुंगातून सोडण्याचा हुकुम दिला.
प्रधान राजासमोर येताच राजाने प्रधानाला सर्व हकीकत सांगून त्याची क्षमा मागितली व विचारले, माझी करंगळी कापली गेली ह्यात नक्कीच ‘श्रींची कृपा’ मला आता दिसत आहे, नाहीतर मला बळी दिले गेले असते. पण मला एक समजले नाही की तुला तुरुंगात टाकल्यावर दुःख होण्याऐवजी तू “श्रींची कृपा झाली” असे का म्हणालास?
मंदस्मित करून प्रधान उत्तराला, “महाराज, श्रीकृपेने आज जर मी तुरुंगात नसतो, तर नक्कीच शिकारीच्यावेळी आपणांबरोबर असतो. अर्थात आपल्याला करंगळी नाही म्हंटल्यावर, त्यांनी माझाच बळी दिला असता.”
असो!

थोडक्यात…..
सदगुरु चरणकमलांचा आश्रय करून, त्यांवर पूर्णपणे निर्भर राहून संसारातील येरझार्‍यातून मुक्त व्हा व (नामाच्या योगाने) मन व इंद्रियांवर अंकुश ठेवून हृदयस्थ परमेश्वराचे दर्शन घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!