कोपेश्वर मंदिर खिद्रापूर.

खिद्रापूर प्राचीन काळी ‘कोप्पम’ किंवा ‘कोप्पद’ या नावाने ओळखले जात होते.

कोपेश्वर मंदिर हे वास्तुशास्त्र व शिल्पकला यांचा मनोहर संगम आहे.सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी आपली शिल्पकला कशी बहराला आली होती त्याची साक्ष देत हे मंदिर अजूनही दिमाखात उभे आहे.

गाभाऱ्याचे वेगळेपण – इथे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर प्रथम दृष्टी जाते ती पिंडीसमोर असलेल्या एका शाळूंखेवर. हिच ती विष्णूची प्रतिकात्मक प्रतिमा धोपेश्वर. हिची उंची शिवलिंगापेक्षा थोडी जास्त आहे. गाभाऱ्यात दोन लिंगांची स्थापना केलेली आहे. एक कोपेश्वर व दुसरा धोपेश्वर.

नंदी नसलेला सभामंडप – शिवदर्शन घेण्यापूर्वी प्रथम नंदीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे.कोपेश्वर येथील मंडपात नंदी नाही.
याला पौराणिक पार्श्वभूमी आहे.प्रजापती दक्षाच्या १६ कन्यांपैकी सती हि सर्वात लहान होती. सर्वांच्या विरोधाला न जुमानता तिने शंकराला वरले. दक्षाच्या मनात शंकराला स्थान नव्हते. दक्षाने केलेल्या बाजपेय यज्ञात त्याने शंकराला बोलावले नाही.आपल्या कन्येला सतीलाही बोलावले नाही. शंकर मानी असल्याने गेले नाहित पण सतीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला. शंकराने तिला नंदीसोबत दक्षाच्या घरी पाठविले म्हणून येथे नंदी नाही.दक्ष यज्ञ घडलेले पौराणिक ठिकाण यडूर येथून दक्षिणेला कृष्णा नदीच्या पलिकडे आहे.
माहेरी गेलेल्या सतीचा अपमान झाला. तिच्या सोबत तिच्या पतीचीही अवहेलना करण्यात आली.अपमान सहन न झाल्यामुळे सतीने धगधगत्या यज्ञकुंडात आत्माहुती दिली.शंकरास हा प्रकार समजताच त्यांनी विरभद्राला अवाहन करून दक्ष यज्ञाचा विध्वंस करायला सांगितले. शंकरांनी क्रोधाने आपल्या जटा भूमीवर आदळून इथे क्रोध प्रकट केला.कोपेश्वर नावाच्या उत्पत्ती मागील ही पौराणिक घटना आहे.

स्वर्ग मंडप – कोपेश्वर मंदिराचे आणखी एक वेगळेपण म्हणजे सभामंडपाला लागून स्वर्गमंडपाची रचना होय.इतरत्र क्वचित असणाऱ्या स्वर्ग मंडप मांडणीत कोपेश्वर चा स्वर्गमंडप सर्वोत्तम आहे.स्वर्गमंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती पैकी ११ हत्ती आज पहावयास मिळतात.
हा स्वर्गमंडप ४८ खांबांवर उभारलेला असून चार प्रमुख दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत.आकाशाच्या दिशेने १३ फूट व्यासाचे गवाक्ष असून त्याच्याखाली त्याच मापाची १३ फूट व्यासाची अखंड रंगशिला आहे व त्याच्याभोवती १२ खांब वर्तुळाकृतीत आहेत.१२ दिशांच्या १२ देवता याच खांबांच्या माथ्यावर आहेत.

अप्रतिम शिल्पवैभव – शिल्पकलेने नटलेल्या कोपेश्वर मंदिरात नरपट्टाखाली गजावर आरुढ देव-देवतांचा अखंड पट्टा म्हणजे गजपट्टा आहे जो इतरत्र कुठेही पहायला मिळत नाही. दृष्टीच्या समपातळीत हा गजपट्टा येत असल्याने गजपट्टाची शिल्पे अत्यंत बारकाव्याने केलेली आहेत.हत्तीवर बसलेल्या देवता, त्यांची आभूषणे, पोषाख, हातातील आयुधे,अलंकार इत्यादींचे अत्यंत सुक्ष्म बारकावे येथे पहायला मिळतात.

चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशीने इ.स.च्या ७ व्या शतकात कोपेश्वर मंदिर बांधले. नरसिंहवर्मन पल्लव व द्वितीय पुलकेशीच्या युद्धात पुलकेशीचा मृत्यू झाला त्या दरम्यान कोपेश्वर मंदिराचे काम बंद पडले. यानंतर इ.स.१२१४ साली यादव सम्राट श्रीसिंघणदेव यांनी कोपेश्वर मंदिराचे उर्वरित काम पुर्ण केले. याचा शिलालेख दक्षिण दरवाज्याजवळ स्थापन केलेला आहे.मंदिर उभारणी ते जिर्णोद्धार यात ६०० वर्षे अंतर आहे.

अंदाजे दिड हजार वर्षांपूर्वीच्या आपल्या देशातील समाज जीवनाचे व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब कोपेश्वर देवालयाच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळते.इथे गजशिल्प प्रमुख आहेत.मंदिराला नरपट्ट सोबत गजपट्ट आहे.नंदीची शिल्पे आहेत.अश्व, भेकड,वराह,मकर,मेष,महिषासुर,यांची शिल्पे आहेत.आंबा,काजू,केळी,उस,द्राक्षघड यांची शिल्पे आहेत.कमळ,कर्दळी अशा अनेक फूलांचे प्रकार इथे शिल्पात पहायला मिळतात.सर्पांची विविध शिल्प आहेत. नखशिखांत आभूषणांनी नटलेल्या युवती आहेत.तसेच आपले नैसर्गिक शरीर सौष्ठव प्रदर्शित करणाऱ्या नग्न तरुणींची शिल्पे आहेत.ध्यानस्थ योग्यांच्या मुर्ती येथे आहेत.दिगंबर श्रावकांची शिल्पे आहेत.ढगळ पोषाखातील अरबी प्रवासी येथे आहेत.तंग पेहराव्यातील तरुणीही आहेत.
माणसातील सारे भावाविष्कार इथे दगडी शिल्पातून प्रकटलेले आहेत.
चेहर्‍यावरील भावभावना सुक्ष्मपणे दगडात चितारलेल्या आहेत. रामायणातील व महाभारतातील प्रसंग आहेत. दशावतारांची शिल्पे आहेत.
गाभाऱ्यात भोवताली भिंतीलगतच्या खांबांना खेटून १८ तरुणी पूजा साहित्य घेऊन उभ्या आहेत.त्यांचे शरीर सौष्ठव अत्यंत कमनीय व देखणे आहे.जणू प्रत्येकाच्या स्वप्नातली सुंदरी येथे प्रकटली आहे.
या मंदिराचे व शिल्पांचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही म्हणूनच हि अदभूत कारागिरी प्रत्येक सौदर्याच्या चाहत्याने प्रत्यक्ष जाऊनच पाहिली पाहिजे असे मला वाटते.

कोपेश्वर मंदिराची तोडफोड: – अत्यंत विकृत रानटी व्यक्तीचेच हात हि सुंदर कारागिरी तोडण्यास धजाऊ शकते. बादशहाच्या आज्ञेने मंदिराच्या मुर्ती फोडल्या अशी लोककथा आजही या परिसरात ऐकायला मिळते.
नदीपलीकडे पूर्वेला शहापूर नावाचे गाव आहे.औरंगजेब बादशहाचा तळ पूर्वी तिथे असायचा म्हणून ते ठिकाण शहापूर नावाने ओळखले जाते. पन्हाळा व विजापूर जिंकण्यासाठी औरंगजेब मिरज येथे होता.इ.स.१७०२ च्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तो मिरज परिसरात कृष्णेकाठी आला तेव्हा कोपेश्वर मंदिराची मोडतोड बादशाही आज्ञेने झाली व तेथील पुजा बंद करण्यात आली.
औरंगजेबाच्या विकृत धर्मवेडाची अनेक उदाहरणे तत्कालीन मोगल दरबारच्या बातमी पत्रातून येतात.

या परकिय रानटी असंस्कृत टोळधाडीच्या मोडतोडी नंतरही कोपेश्वर ची भग्न शिल्पे आजही त्याच पुर्वीच्या दिमाखात धर्मांधांना वाकुल्या दाखवित आपले सौंदर्य प्रदर्शन करत उभी आहेत.