‘जसा भाव तसे फळ’

गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो श्रीगुरूंचा परमभक्त होता. तों काया, वाचा, मनाने श्रीगुरूंची मनोभावे सेवा करीत असे. त्याचा एक नेम होता. श्रीगुरू नित्य सकाळी स्नानसंध्यादी करण्यासाठी भीमा-अमरजा संगमावर जाण्यास निघाले, की वाटेत असलेल्या आपल्या शेतात उभा राहावयाचा व श्रीगुरू दिसले की धावत येऊन त्यांच्या पाया पडायचा. हा त्याचा नेम कित्येक दिवस चालू होता. श्रीगुरू त्याच्याशी काहीही बोलत नसत.

एके दिवशी श्रीगुरुंनी त्याला विचारले, “तू नित्यनेमाने मला नमस्कार करतोस. हे कष्ट का घेतोस ? तुझी इच्छा काय आहे ?” पर्वतेश्वर म्हणाला, “श्रीगुरुंनी माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पाहावे. माझे शेत चांगले पिकले आहे.” “तू शेतात काय पेरले आहेस?” असे श्रीगुरुंनी विचारले असता तो म्हणाला, “ज्वारी पेरली आहे. पीक चांगले आले आहे. आपल्या कृपेने माझ्या शेतात भरपूर धान्य यावे. ” प्रसन्न झालेले श्रीगुरू म्हणाले, ” तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एक काम कर. मी संगमावर जाऊन स्नान-संध्या करून परत येतो, तोपर्यंत तुझे हे सर्व पीक चार बोटे खाली ठेवून कापून टाक.” पर्वतेश्वर म्हणाला, “श्रीगुरुंचे शब्द मला प्रमाण आहेत. मी आपला शब्द मोडणार नाही.” मग श्रीगुरू अनुष्ठानासाठी संगमाकडे निघून गेले. पर्वतेश्वराने पीक कापण्याचा निश्चय केला. तो गावात गेला व तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, ” मला माझे शेतातील ज्वारीचे पीक कापण्याची परवानगी असावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य खंड म्हणून देईन. जर पीक आले नाही तर साठवणीतले देईन. तेही अपुरे पडले तर माझी गुरे जप्त करावीत.” असे वचन देऊन त्याने शेत कापण्याची परवानगी घेतली.

त्याने सगळे पीक कापून टाकले. मग तो संगमावर गेला. श्रीगुरूंना शेतावर घेऊन आला व म्हणाला, “गुरुदेव, आपल्या आज्ञेप्रमाणे मी सगळे पीक कापले.” ” तेव्हा प्रसन्न झालेले श्रीगुरू म्हणाले, ” जसा तुझा भाव तसे तुला फळ मिळेल. धन्य आहे तुझा निर्धार ! तुझ्या श्रद्धेचे मोठे फळ मिळेल. आता तू कसलीही चिंता करू नकोस.” असे आश्वासन देऊन श्रीगुरू मठाकडे गेले.

काही दिवसांनी प्रचंड वादळ झाले. मुसळधार पाऊस सुरु झाला. गावातील शेतकऱ्यांची पिके पार बुडाली. अतोनात नुकसान झाले. ओला दुष्काळ पडला. पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडख्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले. पीक जोरात वाढले. शतपटीने धान्य आले. बाकी सगळ्या गावात धान्याचा दुष्काळ पडला. सर्व लोक दुःखी झाले होते व ते पर्वतेश्वराचे पीक पाहून आश्चर्य करीत होते. पर्वतेश्वराच्या शेतात गावाला पुरून उरेल इतके धान्य आले.

श्रीगुरुंच्यावर ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याच्या घरी दैन्य, दारिद्र्य, दुःख कधीच राहत नाही. जे भावभक्तीने श्रीगुरूंची सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मी त्याच्या घरी अखंड पाणी भरीत असते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *