(दयेचा व्यापक अर्थ, धर्मनीतीचा व्यवहार आणि सत् मुल्यांचे रक्षण याविषयी प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -)
दया तिचे नाव भूतांचे पाळण ।
आणिक निर्दाळण कंटकांचे ।। १।।
धर्मनीतीचा हा ऐकावा वेव्हार ।
निवडिले सार असार ते ।।२।।
पाप त्याचे नाव न विचारिता नीत ।
भलतेचि उन्मत्त करी सदा ।।३।।
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी ।
देवासही आटी जन्म घेणे ।।४।।
अर्थ –
तुकोबा म्हणतात, ज्या कृतीमुळे मानवासहित सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होते आणि असे कल्याण होण्यासाठी प्रसंगी कंटकांचे निर्दालनही करावे लागते त्या कृतीला दया असे म्हणावे. ।।१।।
असा हा धर्मनीतीचा व्यवहार तुम्ही ऐका जो मी सारासार विचार (काय योग्य आणि काय अयोग्य) करुन केला आहे. ।।२।।
जे कोणत्याही नितीनियमाचा विचार न करता उन्मत्त होऊन केले जाते, त्याला पाप म्हणावे. ।।३।।
तुकोबा म्हणतात, धर्माच्या (चांगल्या मुल्यांच्या) रक्षणासाठी आणि अधर्माच्या (वाईट विचारांच्या) नाशासाठी देवाला सुद्धा जन्म घ्यावा लागतो. ।।४।।