अन्नदानाचे महत्त्व फार आहे. अन्नदान म्हणजे एक जीवनदानच आहे. प्राणी भुकेने कासावीस होतो व अगदी लाचार बनतो. धन आणि धान्य यांची जोडी आहे. मनुष्याला दोन्हींचीहि अति आवश्यकता असते हे बोलून दाखवायलाच नको. अन्नं प्राणमुत जीवातुमाहुः | अन्नच प्राण, अन्नच जीवन. अतिशय कडकडून भूक लागली असतां केव्हा दोन घांस अन्न खाईन असे होते. डोळ्यांना अंधारी येते, प्राणांतिक समय वाटतो. भुकेने जीव अतिशय व्याकुळ होतो. कधी कधी अतिक्षुधेने मूर्छा सुद्धां येते. एकंदरीत क्षुधेचा तो माध्यान्हसमय म्हणजे एक प्रलयकाळच होय. देवाने भूक एक अनुभवावयाला लावून, प्राण्यांना प्राणांतिक वेदनांचा अल्पसा परिचयच करून दिला आहे. वेळेवर अन्न न मिळाल्यास प्राण कासावीस होऊन मेल्याचीहि उदाहरणे आहेत.

संदर्भ ( आर्य संस्कृती)