भगवंतांच्या सान्निध्याला मुकण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मनात काही प्रमाणात असलेली व्यावहारीक प्रगतीबद्दलसुद्धा ओढ होय. आपल्या व्यावहारीक अस्तित्वाची पारमार्थिक क्षेत्रातील मर्यादा स्पष्ट केली आहे. भगवंतावर जेव्हा आपली अनन्य भक्ती जडते तेव्हा स्वतःच्या व्यावहारीक जीवनातील छबीवरुन आपले लक्ष पूर्णपणे दूर होऊन स्वतःच्या स्वरुपावर बसते. ज्याप्रमाणे रस्त्यावर चालताना जर स्वतःची सावली कचऱ्याच्या कुंडीवर पडली तर आपण स्वतःला अस्वच्छ मानत नाही,

त्याचप्रमाणे आपले व्यावहारीक व्यक्तिमत्व जरी दुराचारी असले तरी आपल्या स्वरुपाच्या पवित्रतेवर कुठलाही डाग पडत नाही हे आपणांस त्यावेळी कळते. परंतु लक्षात घ्या की आपले स्वरुप सदाकाळी निरंतर निर्मळ, निष्कलंक आहे या वस्तुस्थितीचा उपयोग त्यालाच होतो ज्याचे लक्ष आत्मरुपावर सतत केंद्रित आहे. आणि आत्मरुपावर सतत लक्ष राहणे याचाच अर्थ भगवंतावर अनन्य भक्ती असणे. म्हणून भगवान वरील श्लोकात म्हणत आहेत की एकदा माझ्यावर अनन्य भक्ती बसली की तो मनुष्य सज्जन आहे असे मानायला हवे.

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्‌ ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥
“जर माझ्यावर अनन्य भक्ती जडलेली असेल तर जगातील सर्वात दुष्ट वर्तन करणाऱ्या मनुष्यालासुद्धा सज्जनच मानायला हवे.

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति ॥
ज्याक्षणी त्याचे मन माझ्यावर जडते त्याक्षणीच तो धर्मात्मा बनतो आणि शाश्वत शांति (म्हणजे माझ्या सान्निध्याला) प्राप्त करतो. अर्जुना, तू एक गोष्ट निःसंदेह जाणून घे की माझा भक्त अमर असतो (म्हणजे काय, तर या जगातील कुठलीही गोष्ट वा कृति त्याला माझ्यात एकरुप होण्यास अडवू शकत नाही)

या वक्तव्यामध्ये एक मेख दडलेली आहे. ती म्हणजे भक्तीची अनन्यता असणे. सध्या आपणांस अनेक गोष्टी प्रिय आहेत, त्यामध्ये भगवंतप्राप्ती ही अजून एक इच्छा जोडण्याने अनन्यता निर्माण होत नाही. आधीच्या सर्व इच्छा-आकांक्षांच्या बदल्यात एक भगवंतप्रेम मनात ठेवणे याला अनन्यता म्हणतात. या भक्तीचे बाह्य जीवनात कसे दर्शन होते याबद्दल आपण ३४व्या श्लोकाच्या विवरणात सखोल विचार करु.

सध्या इतकेच बघू की भगवंतप्राप्ती होण्यास व्यावहारीक कामनांबद्दल संपूर्णपणे तटस्थ होणे जरुरी आहे. भगवंतभक्ती निर्भेळ असण्याची आवशक्यता स्पष्ट करण्यास श्रीरामकृष्ण परमहंस म्हणायचे की ज्याप्रमाणे सुईत ओवलेल्या दोऱ्यातील एक धागा जरी भोकात गेला नाही तरी दोरा ओढता येत नाही त्याचप्रमाणे मनात कुठल्यातरी व्यावहारीक गोष्टीच्या ओढीची थोडीशीसुद्धा भेसळ झाली तरी भगवंतप्राप्ती होत नाही.

वर्षोनुवर्षे आलेल्या अशा व्यावहारीक अनुभवांमुळे आपला दृढ विचार झाला आहे की इच्छा उत्पन्न झाल्यानंतर वस्तूची प्राप्ती होण्यास अवधी लागतो. परंतु परमार्थात ही विचारसरणी लागू होत नाही याचे कारण परमार्थातील “वस्तू” आणि “आपण” यात अंतर नाही हे होय. मनात एखादा विचार आला की तो स्वतःच्या बुद्धीला कळण्यास जेव्हढा वेळ लागतो तेव्हढासुद्धा कालावधी आपले भगवंताबरोबर मिलन होण्यास लागत नाही.

त्यामुळे ज्याक्षणी आपल्या मनात भगवंतांबद्दल अनन्य प्रेम उत्पन्न होते त्याक्षणीच आपण धर्मात्मा बनतो आणि आपल्या मनात शांति उत्पन्न होते. लक्षात घ्या की भगवंतप्राप्तीने ही शांती उत्पन्न झालेली नसून, भगवंतावरील प्रेम हे कारण असते. सर्वसाधारणपणे आवडत्या वस्तूच्या प्राप्तीने आनंद होतो, निव्वळ आवडीने नाही. परंतु इथे प्रेम हेच साध्य असल्याने आपल्या मनातील निर्गुणी प्रेम हेच भगवंताचे रुप आहे असे आपण म्हणू शकतो.

ही शांति जगातील एकाही वस्तूवर अवलंबून नसल्याने कुठलीही व्यावहारीक घटना या शांतीला स्पर्श करु शकत नाही. आणि म्हणून ती शाश्वत असते असे भगवान म्हणत आहेत. भगवान जेव्हा माझा भक्त अमर असतो असे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ भक्ताचे शांतिस्वरुप अस्तित्व कालातीत असते असा आपण घ्यायला हवा. या संसारातील भक्ताचे “शरीर-मन-बुद्धी”रुपी अस्तित्व निरंतर राहील असे आश्वासन त्यांनी दिलेले नाही. ज्याप्रमाणे आपले शरीर बालकावस्थेतून यौवनात व नंतर वृद्धापकाळ या अवस्थांत प्रवेश करीत असते त्याचप्रमाणे आपले मूल अस्तित्व (स्वरुप) निरनिराळ्या देहांना धारण करुन शेवटी वरील श्लोकांत वर्णन केलेल्या शांतीमध्ये पदार्पण करणार आहे. आपणां सर्वांची हीच अंतिम गति आहे.