एकदा महाराज लोकांशी सहज गप्पा मारत बसले होते. म्हणाले “लोक काळजी का करतात? काळजी करून काय होते. कर्ता राम हा भाव पक्का हवा. गोपाळराव, तुम्हाला कसली काळजी आहे?”
गोपाळराव म्हणाले, “अहो, मलीचे लग्न जमत नाही. काळजी नाही का वाटणार?” दुसरे एक जण म्हणाले, “मला मुलगा नाही. म्हातारपणी कोण सांभाळणार?” तिसरे म्हणाले, “माझ्याजवळ पैसा नाही.” चौथे म्हणाले, “माझी बायको दिवसभर गावात हिंडते.” पाचवे म्हणाले, “आमचे कुटुंब फार वाढले हो. फार हाल होतात.” सहावे म्हणाले, “माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. पण हे असेच राहील की नाही अशी शंका वाटते.” महाराज म्हणाले, “तुम्हा सर्वांची स्थिती अगदी काळजी करण्यासारखीच आहे. पण माझ्या नशिबी काही काळजी दिसत नाही. मला मुलगी नाही. बायको आंधळी, मुलगा नाही. पैसा तर नाहीच नाही. तरीपण मला काळजी लागेल असे काही आपल्याला सुचते का?” एक गृहस्थ म्हणाले, “अहो, आपण
अन्नदानासाठी प्रसिद्ध आहात. आज स्वयंपाकघरात मीठ तिखटाशिवाय काहीही नाही.” महाराज म्हणाले, “बरं मग?” त्यावर ते गृहस्थ म्हणाले, “उद्या शंभर जोडप्यांना भोजनास सांगावे.’ ‘बरं’ म्हणाले. बोलावणी गेली. दुसरे दिवशी काहीच काम नसल्याने सगळी माणसे, भजनाला, कीर्तनाला बसली. महाराजांनी अभंग घेतला. ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो रे।’ सुरुवातीला निरूपण चांगले रंगले. पण मग सर्वांची चुळबुळ सुरू झाली. कोणी म्हणे “म्हातारी माणसे, मुले-बाळे यांना भात तरी हवा होता.” दुपारी १२ वाजून गेले. सारे शांत होते. एक मुलगा आईजवळ जेवण मागू लागला. ती म्हणाली, ‘जा महाराजांना सांग.” मुलानी महाराजांच्या कमरेला विळखा घातला व म्हणाला, “मला भूक लागली आहे. भात हवाय.” महाराज म्हणाले, ‘जा रामरायाला सांग.” त्याने तसेच केले आणि काय आश्चर्य ! सामानाने भरलेली एक गाडी आली. स्वयंपाकाची सगळी तयारी होती. अगदी भाजीसुद्धा निवडलेली होती. तो मालक महाराजांजवळ आला व म्हणाला, ‘महाराज, मला मुलगा झाल्यावर दोनशे मंडळी जेवायला घालीन असे ती (बायको) म्हणाली होती. आज महिना झाला. तेव्हा कृपया या सामानाचा स्वीकार व्हावा.” महाराजांनी ‘जानकीजीवन स्मरण जय जय राम’ म्हणत रामरायाला दंडवत घातला व लगेच स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. सुंदर स्वयंपाक होऊन नैवेद्य व जेवणे झाली. महाराज म्हणाले, “आपण थोडा धीर धरावा. खऱ्या अर्थाने, शुद्ध मनाने, निष्ठापूर्वक रामावर भार टाकला तर तो पोटभर देतो. आपली निष्ठाच कमी पडते. रामराय मात्र अगदी बेमालूम काम करतो.”