व्यक्तिमत्व आहे तोवर कर्म आहे.

सांख्यशास्त्रात आपल्या अस्तित्वाचे पुरुष आणि प्रकृति असे दोन भाग सांगितले आहेत. त्यातील प्रकृति म्हणजे आपले व्यक्‍तिमत्व होय. मी कोण आहे हे तुम्ही स्वतःचे नाव, शैक्षणिक पात्रता, सामाजिक स्थान इत्यादींचा आधार घेऊन शब्दात सांगू शकलात तर अजून तुम्ही प्रकृतिमध्येच अडकलेले आहात हे ध्यानात घ्या. आपण कोण आहोत हे जेव्हा स्वसंवेदनांनी अपरोक्षपणे तुम्हाला जाणवेल तेव्हा आपोआप कधीच कर्मात अडकलेला नव्हता याची जाणीव होऊन तुम्ही कर्मबंधनांतून मुक्त होता. बाकी सर्व उपाय एक बंधन सोडवून दुसऱ्या बंधनात स्वतःला घालण्यासारखे आहेत.

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ गीता श्लोक ॥
कर्माचा नियम कुणाला चुकला आहे? भगवंताचे अवतारदेखील या नियमांचे उल्लंघन सहजासहजी करु शकत नाहीत, मग आपली गोष्ट करायलाच नको. पूर्वकर्मांच्या फळाला तोंड देताना ज्या क्रिया होतात त्यांनी नवीन कर्मबंधने निर्माण होत असल्याने कर्मांच्या तावडीतून सुटका कशी होणार ही भिती साधकाला सतत भेडसावित असते.

स्वप्रयत्‍नांनी कर्मफळांच्या तावडीतून सुटणे असंभव आहे. अशा हतबल स्थितीमध्ये आपला विवेक नष्ट हो‍उन बुध्दी चालेनाशी होते. मग काही साधक ‘आत्तापर्यंत जी कर्मे झालेली आहेत त्यांना आपण पुसू शकत नाही. पण निदान नवीन कर्मे आरंभ करणे तर आपण थांबवू शकतो ना’ असा विचार करुन कर्मसंन्यास घेण्याचा निर्णय घेतात. परंतु एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याआधी ती गोष्ट कशी आहे, काय आहे आणि कुठे आहे याचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते.

त्यामुळे वरकरणी हा निर्णय योग्य वाटला तरी हा निर्णय स्वतःच्या जीवनात अंमलात आणण्यासाठी आपणास कर्मे म्हणजे काय याचे पूर्ण ज्ञान असणे अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच तो आपल्या कुवतीबाहेर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जरी आपणास कर्म म्हणजे काय याचे संपूर्ण ज्ञान झाले आणि अथक प्रयत्‍नांनी आपण कर्मसंन्यास केला तरी ‘कर्मसंन्यास करणे’ हे आपले नवीन कर्म शिल्लक राहतेच!! तेव्हा कुठल्याही साधनेने आपण कर्मांचा त्याग करणे असंभव आहे हे अगदी स्पष्ट आहे. आज प्रवचनाला घेतलेल्या श्लोकामधून भगवान हीच गोष्ट निराळ्या रीतीने अर्जुनाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्‍न करीत आहेत.

‘आपण स्वतःची कर्मे थांबवू शकतो’ ही भावनाच चुकीची आहे!! ज्याप्रमाणे सशाची शिंगे कल्पनेच्या राज्यातच खरी असतात, वा मृगजळातील पाणी बघणाऱ्याच्या मनातच असते त्याचप्रमाणे मी स्वकर्मे थांबवू शकतो ही भावना निव्वळ काल्पनिक आहे. भगवान म्हणत आहेत: ‘कुठलाही मनुष्य क्षणभरसुध्दा कर्मरहित राहू शकत नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये जे गुण आहेत ते त्यांच्या वैशिष्ट्यानुसार अनुषंगिक कर्मे करण्यास त्याला भाग पाडणारच.

एकाच गोष्टीची अनेक स्तरांवर जाणीव हो‍उ शकते आणि सूक्ष्म जाणीव होइपर्यंत आपण सध्याच्या ज्ञानालाच अंतिम मानत असतो. स्वकर्म या कल्पनेला लागू होते. असे बघा, स्वतःचे खरे रुप ओळखल्याशिवाय आपण कुठले कर्म केले आहे हे कसे कळणार. त्याचप्रमाणे आपला देह हे स्वतःशिवायचे एक वेगळे अस्तित्व आहे हे जर कळले तर त्या देहाने केलेली कर्मे मी केली असे आपण म्हणू शकणार नाही. लहानपणापासून आपल्या देहात परीवर्तन घडलेले असल्याने आणि लहानपणचे आपण आणि सध्याचे आपण एकच आहोत याची पूर्ण खात्री स्वतःला असल्याने आपले अस्तित्व देहापेक्षा भिन्न आहे याची जाणीव सर्वांनाच असते. मग स्वतःच्या देहाकडून घडलेली कर्मे ‘मी केली’ असे आपण का म्हणतो.

देहाने कर्मे करण्याआधी आपल्या मनात त्या कर्मांचा विचार आलेला असतो. देहापेक्षा आपण भिन्न आहोत हे कळलेले असले तरी मनातील विचारांत आपण नाही असे कुणाला वाटत नाही. त्यामुळे जेव्हा ‘मी अमुक एक गोष्ट केली’ असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनातील त्या गोष्टीबद्दलच्या आपुलकीमुळे तीचे कर्तृत्व आपण स्वतःकडे घेत असतो. देह आणि मन यांच्या युतीमध्ये जोपर्यंत आपण स्वतःला बघत असतो तोपर्यंत कर्मांच्या तावडीतून आपली सुटका होणे निव्वळ अशक्य आहे. स्वतःला अशा मर्यादीत रुपात बघणे म्हणजे प्रकृतीच्या कचाट्यात स्वतःला अडकविण्यासारखे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!