सारांश १
समोर आपल्यासारखीच ईश्वराची मूर्ती दिसत असली की , मनुष्य त्यात जास्त रमतो हा मनुष्य स्वभाव आहे कारण माणसाला प्रेम करायला त्याच्यासारखाच देहधारी समोर असावा लागतो. मग त्याची चरित्रे , त्याच्या लीला , त्याचं गुणवर्णन , त्याचं साधू रक्षणाचं कार्य यांच्या आठवणीत तो रंगून जातो. ही सगुणोपासना होय तर ईश्वर निर्गुण निराकार आहे हे त्याचे मूळ स्वरूप लक्षात घेऊन ज्ञानमार्गी त्याची निर्गुण रूपात उपासना करतात.
सगुणोपासना पूर्ण झाल्याशिवाय निर्गुण उपासना करता येत नाही हे लक्षात घेऊन साधुसंत सगुणोपासना करण्याची शिफारस करतात. भगवंतांवर मनापासून प्रेम करण्याचा उपदेश करतात. सगुणोपासना करत करत देव आपल्यातच आहे असा साक्षात्कार भक्ताला होऊ लागतो. आपण आणि देव एकच आहोत हे लक्षात येते. तसेच आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या व्यक्तींमधील ईश्वरही त्याला दिसू लागतो. त्याचा अपपर भाव मावळतो. असं सर्वत्र ईश्वराचं अस्तित्व जाणवू लागलं की , पुढं जाऊन ईश्वराचं सर्वव्यापी स्वरूप भक्ताच्या लक्षात येऊ लागतं. आता त्याला उपासना करण्यासाठी सगुण साकार स्वरूपातल्या ईश्वराच्या मूर्तीची गरज भासत नाही. अर्थात अशी अनुभूती येण्याला बराच काळ सगुणोपासना करावी लागते आणि मग निर्गुणत्वाचा साक्षात्कार होऊ लागतो. त्यामुळे निर्गुण उपासना करतो म्हणून ती होत नाही त्यासाठी माणसाची मानसिकता तशी तयार व्हावी लागते. ती तशी तयार झाली की , त्याला संसार असार वाटून सर्वव्यापी ईश्वर सर्वत्र जाणवू लागतो. बाप्पाना सगुणाची उपासना करणारा प्रिय आहे की , निर्गुणाची उपासना करणारा प्रिय आहे असा प्रश्न विचारला असता
उत्तरादाखल बाप्पानी सांगितलं की , जो भक्त माझ्या मूर्तीची पूजाअर्चा करून अनन्य भावाने मला भजतो तो मला अतिशय प्रिय आहे. येथे अनन्य या शब्दाला फार महत्व आहे. बाप्पांच्याशिवाय अन्य काही अस्तित्वातच नाही अशी खात्री ज्याला वाटते तोच बाप्पांची अनन्य भक्ती करू शकतो. रडणाऱ्या लहान मुलाला आई आधी खेळणी देऊन गप्प करण्याचा प्रयत्न करते तरीही त्यानं जर ऐकलं नाही तर कडेवर घेते. आपण त्या लहान बाळाच्याच भूमिकेत आहोत. आपल्याला आईस्वरूप ईश्वर हवा असतो पण त्याचबरोबर इतर संसारिक गोष्टीही हव्या असतात. म्हणून ईश्वर आपल्याला आप्तस्वकीय , नातेवाईक , मित्र , धनदौलत , मानमरातब इत्यादि गोष्टी बहाल करतो आणि आपण त्यात रमतो. ईश्वरही म्हणतो ठीक आहे , अजून हे मडकं कच्चंच आहे पण आपल्या पूर्वपुण्याईने ईश्वरकृपेमुळे जर आपल्याला जाणीव झाली की , हे सर्व मिथ्या असून केवळ ईश्वरप्राप्ती हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं तर मग मात्र आपल्याला ईश्वर प्राप्तीची तळमळ लागते. आपल्याला संसार मिथ्या आहे हे कळल्यावर ईश्वर कधी भेटेल अशी तळमळ लागली पाहिजे. मागले सुटले आहे आणि पुढचे मिळायचे आहे तोपर्यंत मनाची जी घालमेल होते त्याला तळमळ म्हणतात. व्यवहारातील गोष्टींसाठी अशी तळमळ लागून बऱ्याचवेळा आपली घालमेल होत असते पण ज्याची ईश्वरप्राप्तीसाठी अशी घालमेल होते तो धन्य होय कारण त्याला ईश्वराशिवाय अन्य काहीच नको असते. म्हणजेच त्याने ईश्वराशी अनन्यता साधलेली असते.
सगुणोपासना करणं , निर्गुणोपासना करण्यापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या सोपं असतं कारण निर्गुण रूप डोळ्यांना दिसत नाही , मनाला अनुभवता येत नाही आणि बुद्धीलाही आकलन होत नाही. ती कठीण आणि क्लेशदायक असते असं म्हणायचं कारण म्हणजे इंद्रिये स्वभावतःच बहिर्मुख व विषयासक्त असतात. ती माणसाला विषयाकडे फरफटत नेतात. इंद्रियांचे संयमन करण्यात माणसाला काही प्रमाणात यश मिळाले तरी मन कल्पनेने विषयांचा विचार करत असते. तसेच माणसाचा अहंकार माणसाचा घात करण्यास टपलेला असतोच. डोळ्यासमोर विषय दिसत असताना विवेकाने त्यातील मिथ्यत्व अनुभवणे फार अवघड असते. निष्काम कर्मयोगाच्या आचरणाने हळूहळू मनुष्य निर्गुण उपासनेत यश मिळवू शकतो. मी निर्गुण उपासना करीन म्हणून निर्गुण उपासना करता येत नाही. जे निर्गुणोपासना करत असतात ते पूर्वी सगुण उपासना करूनच पुढे आलेले असतात. हा प्रवास अनेक जन्मांचा असू शकतो. जे निर्गुण उपासना करतात त्यांच्या मनात संसाराविषयी नावड उपजतच निर्माण झालेली असते त्यामुळे ते प्रथम पासूनच याच्यामागे असतात. त्यामागे त्यांच्या पूर्वजन्मी केलेल्या सगुणोपासनेचे पुण्य उभे असते. म्हणून माणसाने सगुणोपासनेने सुरवात करावी. सगुणोपासना बहुतेकजण ईश्वराच्या मूर्तीशी तल्लीन होऊन करतात. सगुणोपासनेतून त्याला ईश्वराशिवाय इतर गोष्टी गौण वाटू लागतात. मग इंद्रियांनी कितीही प्रलोभने दाखवली तरी मनास त्याची काहीही किंमत वाटत नाही. असे भक्त संसारात वावरत असतात पण फक्त कर्तव्य करण्यापूरतेच कारण त्यांना त्यातून काहीच साध्य करायचे नसल्याने त्यांना संसारापासून कोणतीच अपेक्षा नसते. अशी सगुणोपासना अनेक वर्षे केल्यावर भक्ताला हळूहळू समोर ईश्वराची मूर्ती समोर दिसत नसली , तरी त्याची सर्वत्र असलेली उपस्थिती जाणवू लागते. सर्व चेतन अचेतन वस्तुतील ईश्वराचे अस्तित्व ध्यानात येऊ लागते आणि मग त्याची निर्गुणोपासना आपोआप सुरू होते. निर्गुणोपासना करणाऱ्याचा संसारसागरातून फार लवकर उद्धार होतो