॥ श्रीराम समर्थ ॥
श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत अमृतघुटका
परिच्छेद १ आणि ११ वासनाबीज नाहीसे होणे हीच ब्रह्मज्ञानाची खूण

बहुत सामर्थ्य मिळवूनि म्हणे ‘मी सिद्ध’ | जगामाजीं प्रसिद्ध |
दिवसा मशाली, उठवी मेलें प्रेत | पुढें न बोले कोणी एक |
समस्त राजे पादाक्रांत | आत्मस्तुतीं सदा डुल्लत |
तयाचें वासनाबीज जरी न मोडे | तयासी आत्मज्ञानी म्हणती वेडे |
वासनाबीज गेलें मुरोन | तेचि ब्रह्मज्ञानाची खूण |
दुधासि घातलें मुरवण | तयासि दूध म्हणेल कोण ॥११॥
(अशुद्ध ज्ञानाच्या मागे लागून मनुष्य आपला व दुसर्याला असा घात करून घेतो -)
एखादा माणूस (हठयोग, मंत्रविद्या वगैरे साधन करून) काही सामर्थ्य मिळवून ‘मी सिद्ध झालो’ असे म्हणतो. सिद्ध म्हणून जगामध्ये प्रसिद्धीही मिळवितो; दिवसा मशाली पाजळून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करतो; मेलेल्याला उठविण्यासारखे (अद्भुत वाटणारे) चमत्कार करतो; त्यामुळे त्याच्यासमोर बोलण्यासही कोणी धजत नाहे, राजे-महाराजे सुद्धा त्याचे अंकित होतात (मग इतरांची काय गोष्ट?) आणि स्तुतिपाठकांच्या स्तुतीच्या मदाने तो सदा डोलत असतो.
पण त्याचे वासनाबीज शिल्लकच असते. त्यामुळे ज्यांना खरे काही कळत नसते ते सामान्य जनच तेवढे त्याला ‘आत्मज्ञानी’ समजतात (त्याला ‘आत्मज्ञानी’ म्हणणारे वेडेच समजावेत). वास्तविक पाहता, वासनाबीज पूर्णपणे जिरून जाणे, नष्ट होणे हीच ब्रह्मज्ञान झाल्याची खरी खूण होय. दुधाला विरजण घातले म्हणजे त्याचे दूध हे स्वरूप नष्टच होते. (त्याप्रमाणे वासनाबीज नष्ट झाले म्हणजेच जीवात्म्याचे जीवरूप नष्ट होऊन तो शिवरूप होतो).
टीप – पुष्कळ लोक योगविद्या, मंत्रविद्या असल्या विद्यांच्या साधनाकडे वळतात. त्यांत अभिप्रेत असलेल्या शक्ती पुरेशा अभ्यासाने प्राप्त झालेले लोकही आढळतात. पण (१) त्या शक्ती वापराव्या त्याप्रमाणात क्षीण होत जातात आणि (२)
याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे ऐहिक हेतूसाठी त्यांचा उपयोग करण्याचा मोह झाल्याशिवाय रहात नाही. कधी कधी असा सिद्धी प्राप्त झालेला माणूस परहितासाठी, परोपकारासाठी म्हणून त्यांचा वापर करू लागतो. पण ही भावना शेवटपर्यंत टिकून राहणे अशक्यप्राय असते आणि खरा वासनानाश झालेला नसल्याने केव्हा ना केव्हा तरी त्या शक्ती स्वार्थलाभासाठी वापरण्याचा मोह उत्पन्न होतो. येथून अनाचाराला सुरूवात होऊन अखेरीस त्या व्यक्तीचा आध्यात्मिक अधःपात होतो.
यासाठीच संत टाहो फोडून अट्टाहासाने भक्तिमार्गाचा उपदेश करतात. भक्ती याचा अर्थ भगवंताविषयी निरपेक्ष, निरतिशय प्रेम. नामसाधनाने हे प्रेम वाढत वाढत व शुद्ध होत होत अखेर अनन्यशरणागतीत, आत्मनिवेदनात त्याची परिणति होते, साधक पूर्णपणे तद्रूप, अविभक्त बनतो; याचाच अर्थ त्याचे वासनाबीज जळून जाते आणि तो आत्मज्ञानी होतो. या प्रक्रियेमध्ये प्रेमभाव हे सूत्र प्रथमपासून अखेरपर्यंत असल्याने शक्ती येते ती प्रेमरूपच असते.
स्वार्थाचा संभवच उरत नाही, दुरूपयोग होणे अशक्यच असते. तेव्हा माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की, नुसत्या चमत्काराचे महत्व मानू नये. ध्येय भक्त होण्याचे ठेवावे आणि त्यासाठी नामस्मरणासारखे सुलभ व परिणामकारक साधन नाही. नामदेखील इतर कोणत्याही हेतूसाठी नसावे, नामासाठीच नाम घ्यावे. या मार्गात धोका तर नाहीच आणि ध्येय अत्यंत शुद्ध, अत्युच्च आहे.
॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥
॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.
ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ
ॐ सद्गुरूमाता सुनिती पांडुरंग सुतार आईसाहेब (माई) की जय ॐ
ॐ सद्गुरु श्री चिन्मयानंद शंकरनाथ दगडे महाराज कि जय . ॐ
ॐ सदगुरु श्री भक्तवात्सल्य संत तुकामाईनाथ महाराज कि जय. ॐ