श्रीमद् भागवत महापुराण – स्कंध ११ वा – अध्याय १४ वा – भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधी

उद्धवाने विचारले ! श्रीकृष्णा ! ब्रह्मवादी महात्म्यांनी आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान, इत्यादी अनेक साधने सांगितली आहेत हे सर्वच मुख्य आहेत की, यांपैकी कोणते तरी एक मुख्य आहे ? स्वामी ! आपण भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे, असे सांगितले या भक्तीने सर्व तर्‍हेची आसक्ती नाहीशी होऊन मन आपल्या ठायीच लागून राहाते. (१-२)

श्रीभगवान म्हणाले प्रलयाच्या वेळी काळाच्या प्रभावाने ही वेदवाणी लुप्त झाली होती नंतर जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा मी ती ब्रह्मदेवांना दिली तिच्यामध्ये माझ्या भागवतधर्माचे निरूपण आहे. ब्रह्मदेवाने ती आपला ज्येष्ठ पुत्र स्वायंभुव मनू याला सांगितली नंतर त्याच्याकडून भृगू इत्यादी सात ब्राह्मषर्नीीं तिचे ग्रहण केले. त्या सात महषर्कींडून त्यांचे पुत्र देव, दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, किंदेव, किन्नर, नाग, राक्षस, किंपुरूष इत्यादी अनेकजणांनी वेदांचे ज्ञान प्राप्त करून घेतले यांपैकी काही सात्त्विक, काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते. या स्वभाववैचित्र्यामुळे देव, असुर, मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या बुद्धी वेगवेगळ्या झाल्या त्या बुद्धीप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळे केले गेले. अशा रीतीने स्वभाववैचित्र्यामुळे आणि परंपरेमुळे माणसांच्या विचारांत फरक पडतो तर काही माणसे वेदविरोधी मते मांडणारी असतात. हे पुरूषश्रेष्ठा ! लोकांची बुद्धी माझ्या मायेने अविवेकी बनलेली असते त्यामुळे त्यांना ज्या कर्मात जशी गोडी वाटते त्यानुसार तेच कल्याणाचे साधन आहे, असे ते सांगतात त्यामुळे साधनांत वेगळेपणा येतो. त्यांपैकी मीमांसक कर्माला, साहित्यिक कीर्तीला, कामशास्त्री कामाला, योगशास्त्री सत्य, दम आणि शमाला, राजनीतिज्ञ ऐश्वर्याला, संन्यासी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन मानतात. काहीजण यज्ञ, तप, दान, व्रते, नियम, यम इत्यादींना कल्याणाचे साधन म्हणतात या लोकांना त्या त्या कर्मानुसार त्या त्या लोकांची प्राप्ती होते पण हे लोक उत्पन्न होणारे असल्यामुळे नाशवंत आहेत शिवाय यांचा शेवट दुःखात होतो हे तामसी आहेत यात आनंद नावापुरताच असतो या सर्व कारणांमुळे हे दुःखमयच आहेत. (३-११)

हे साधो ! ज्याने स्वतःला संपूर्णपणे मला समर्पित केले आहे आणि त्यामुळे ज्याला कोणत्याही विषयाची इच्छा नाही, त्याला आत्मस्वरूप माझ्यामुळे जे सुख मिळते, ते विषयलोभी जीवांना कसे मिळेल ? जो अपरिग्रही आहे, इंद्रियांवर ज्याने विजय मिळविला आहे, जो शांत आणि समचित्त आहे, माझ्या ठायी जो संतुष्ट आहे, अशा माझ्या भक्ताला सर्व दिशा आनंदाने भरलेल्या वाटतात. माझ्या ठिकाणी ज्याने स्वतःला समर्पित केले अशा भक्ताला, माझ्याशिवाय ब्रह्मदेवाचा सत्यलोक, इंद्राचा स्वर्ग, साम्राज्य, रसातळाचे राज्य, योगसिद्धी किंवा मोक्ष यांपैकी काहीही नको असते. हे उद्धवा ! मला तुझ्यासारखे प्रेमी भक्त जितके प्रिय असतात, तितका ब्रह्मदेव, शंकर, बलराम, लक्ष्मी किंबहूना माझा आत्माही मला प्रिय नाही. ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जो शान्त व वैरभावरहित असतो, सर्वांबद्दल समान दृष्टी ठेवतो, त्या महात्म्याच्या चरणांच्या धुळीने माझ्या आत असलेले लोक पवित्र व्हावेत, म्हणून मी नेहमी त्यांच्या मागून जात असतो. जे अपरिग्रही असतात, ज्यांचे चित्त माझ्या ठायीच रममाण झालेले असते, जे महापुरूष अतिशय शांत प्रकृतीचे असतात, सर्व जीवांबद्दलच ज्यांना प्रेम वाटते, कामनांमुळे ज्यांची बुद्धी दूषित होत नाही, अशा भक्तांना निरपेक्षपणामुळे माझ्या ज्या परमानंदाचा अनुभव येतो, त्याची इतरांना कल्पना येणार नाही. (१२-१७)

इंद्रियांवर विजय मिळवू न शकलेल्या माझ्या भक्ताला विषय स्वतःकडे ओढत असले तरी माझ्या ठिकाणी वाढणार्‍या त्यांच्या भक्तीच्या प्रभावामुळे विषय त्याच्यावर आक्रमण करू शकत नाहीत. धगधगता अग्नी जसा सर्व जळणाची राख करून टाकतो, त्याचप्रमाणे उद्ववा ! माझी भक्तीसुद्धा पापाच्या सगळ्या राशी जाळून टाकते. हे उद्धवा ! माझ्या अनन्य भक्तीने जसा मी प्राप्त होतो, तसा योग, ज्ञान, धर्माचरण, स्वाध्याय, तप किंवा त्याग यांनी प्राप्त होत नाही. संतांना प्रिय असणारा त्यांचा आत्मा असा मी केवळ श्रद्धाभक्तीनेच प्राप्त होतो जन्माने चांडाळ असलेल्यांनाही माझी भक्ती पवित्र करते. याउलट सत्य आणि दयेने युक्त असा धर्म किंवा तपश्चर्येसह ज्ञान, माझी भक्ती नसेल तर, त्या व्यक्तीला पवित्र करू शकत नाही. भक्तीने जोपर्यंत शरीर पुलकित होत नाही, चित्त द्रवत नाही, आनंदाश्रू वाहात नाहीत, तोपर्यंत अंतःकरण पूर्ण शुद्ध कसे होईल ? ज्याची वाणी भक्तीने सद्‌गदित होते, चित्त द्रवते, जो वियोगाने कधी रडतो तर कधी भेटीने हसतो, लाज सोडून कधी उच्चस्वरात गातो तर कधी नाचतो, असा माझा भक्त सर्व जगाला पवित्र करतो. सोने ज्याप्रमाणे अग्नीने आपल्यातील मळ टाकून देऊन शुद्ध होते आणि आपल्या खर्‍या रूपाने चमकू लागते, त्याप्रमाणे मनुष्य जेव्हा माझी भक्ती करतो, तेव्हा त्या भक्तियोगाने आपल्या कर्मवासनांचा नाश करून आपले निजस्वरूप असलेल्या मला परमात्म्याला प्राप्त होतो. उद्धवा ! माझ्या परमपावन लीलाकथांच्या श्रवणकीर्तनाने जसजसा चित्तातील मळ धुतला जातो, तसतसा माझा भक्त, डोळ्यात अंजन घातल्याने जसा डोळा बारीक वस्तूही पाहू शकतो, तसा सूक्ष्म अशा मला पाहू शकतो. (१८-२६)

जो विषयांचे चिंतन करतो, त्याचे चित्त विषयात गुंतते आणि जो नेहमी माझे स्मरण करतो, त्याचे चित्त माझ्या ठायी तल्लीन होऊन जाते. नाशवंत विषयांचे चिंतन, स्वप्नाप्रमाणे किंवा मनोरथांप्रमाणे खोटे आहे म्हणून त्यांचे चिंतन करण्याचे सोडून, माझ्या भक्तीत रंगलेले मन माझ्या ठिकाणी लावावे. स्त्रियांच्या किंवा स्त्रीलंपटांच्या संगतीमुळे जितके दुःख किंवा संसारबंधन उत्पन्न होते, तसे आणखी कोणाच्याही संगतीने उत्पन्न होत नाही म्हणून साधकाने इंद्रिये ताब्यात ठेवून स्त्रिया आणि स्त्रीलंपट यांची संगत पूर्णपणे सोडून एकांत, पवित्र ठिकाणी बसून, आळस सोडून माझे चिंतन करावे. (२७-३०)

उद्धवाने विचारले हे कमलनयना ! मुमुक्षूने आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे, हे आपण मला सांगावे. (३१)

भगवान श्रीकृष्ण म्हणाले फार उंच किंवा फार खोल नसलेल्या सपाट आसनावर शरीर ताठ ठेवून आरामात बसावे हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नाकाच्या अग्रभागी लावावी. यानंतर पूरक, कुंभक आणि रेचक या क्रमाने प्राणायामाने नाडीशोधन करावे हे एकदा डाव्या नाकपुडीने व एकदा उजव्या नाकपुडीनेही करता येईल हा अभ्यास हळूहळू वाढवावा त्याचबरोबर इंद्रियांवर ताबा ठेवावा. मूलाधारात उत्पन्न झालेला ॐकार प्राणवायूच्या साह्याने मस्तकापर्यंत न्यावा कमळातील बिसतंतूप्रमाणे तो अखंड असून त्याचा नाद घंटानादाप्रमाणे आहे, असे मनात चिंतन करावे अशा रीतीने दररोज तीन वेळा, प्रत्येक वेळी दहा वेळा, ॐकारासहित प्राणायामाचा अभ्यास करावा असे केल्याने एक महिन्याच्या आतच प्राणवायू वश होतो. त्यानंतर शरीराच्या आत वर देठ आणि खाली मुख असलेले हे हृदयकमळ त्याचे मुख वरच्या बाजूला होऊन ते उमलेले आहे, त्याला आठ पाकळ्या आहेत आणि त्याच्या मधोमध पिवळा गड्डा. (कर्णिका) आहे, असे चिंतन करावे. कर्णिकेवर अनुक्रमे सूर्य, चंद्र आणि अग्नी यांची स्थापना करावी त्यानंतर अग्नीमध्ये माझ्या या रूपाचे स्मरण करावे माझे हे स्वरूप ध्यानासाठी अत्यंत मंगलमय आहे. (३२-३७)

माझ्या भगवंतांचे सर्व अवयव सुडौल आहेत मुखकमल अत्यंत शान्त आणि सुंदर आहे चार मनोहर आजानु बाहू आहेत अतिशय सुंदर व मनोहर गळा आहे स्मितहास्याने शोभणारे गाल आहेत दोन्ही समान कानामध्ये मकराकृती कुंडले तळपत आहेत पावसाळ्यातील ढगाप्रमाणे श्यामवर्णाच्या शरीरावर पीतांबर शोभत आहे वक्षःस्थळावर एका बाजूला श्रीवत्साचे चिन्ह आणि दुसर्‍या बाजूला लक्ष्मी विराजमान झाली आहे हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले आहे गळ्यात वनमाला शोभून दिसत आहे पायांमध्ये नूपुरे शोभत आहेत गळ्यात कौस्तुभमणी झगमगत आहे आपापल्या स्थानी चमचमणारे किरीट, कडी कमरपट्टा आणि बाजूबंद शोभून दिसत आहेत सर्वांगसुंदर असे हे रूप भक्तांचे हृदय हरण करणारे आहे त्यांची प्रेम पूर्ण नजर कृपाप्रसादाचा वर्षाव करीत आहे सर्व अवयवांवर मन स्थिर करीत माझ्या या सुकुमार रूपाचे ध्यान करावे. (३८-४१)

बुद्धिमान माणसाने मनाने इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून बाजूला करून त्या मनाला बुद्धिरूप सारथ्याच्या साहाय्याने सर्वतोपरी माझ्या ठिकाणी लावावे. संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेल्या चित्ताला तेथून ओढून आणून एकेका अवयवावर स्थिर करावे आणि शेवटी अन्य अवयवांचे चिंतन न करता केवळ मंद हास्ययुक्त मुखावर दृष्टी स्थिर करावी. जेव्हा चित्त मुखारविंदावर स्थिर होईल, तेव्हा ते तेथून काढून घेऊन आकाशात स्थिर करावे त्यानंतर आकाशाचे सुद्धा चिंतन करणे सोडून देऊन माझ्या स्वरूपावर आरूढ व्हावे आणि माझ्याखेरीज अन्य कशाचेही चिंतन करू नये. जेव्हा अशा प्रकारे चित्त एकाग्र होते, तेव्हा ज्याप्रमाणे एक ज्योत दुसर्‍या ज्योतीत मिळून एकरूप होते, त्याचप्रमाणे भक्त स्वतःमध्ये मला आणि मज सर्वात्म्यात स्वतःला पाहू लागतो. अशा प्रकारे जो योगी अत्यंत तीव्र ध्यानाच्याद्वारे माझ्यामध्येच आपले चित्त एकाग्र करतो, त्याचा द्रव्य, ज्ञान, क्रियांविषयीचा अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो आणि त्याला सगळीकडे परमात्म्याचेच स्वरूप दिसू लागते त्यामुळे त्याला तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!