भगवान श्रीकृष्णांचे खरे रुप कळल्याने आपल्यामध्ये कसा फरक होऊ शकतो. बंगलोरमध्ये पाणी घालून जैसलमेरच्या वाळवंटातील एका झाडाला पाणी मिळणे जसे असंभव आहे तसेच परव्यक्‍तीबद्दलचे ज्ञान स्वतःला जाणून घेण्यास अनुपयोगी आहे असे आपणास वाटण्याची शक्यता आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. स्वतःचे आत्मस्वरुप निःसंदेह जाणून घेणे हे परमार्थाचे अंतिम ध्येय आहे यात शंका नसली तरी ते आत्मरुप जाणून घेण्यामध्ये आपल्या वासनांचा अडथळा होत असतो.

आपल्या मनात स्वतःबद्दलच्या इतक्या प्रतिमा दृढ झाल्या आहेत की स्वतःचे सत्यरुप गोचर होणे अतिशय कठीण आहे. कळत नकळत आपण कुठेनाकुठे स्वतःला एका आदर्श साच्यात बसविण्याचा प्रयत्‍न करीत असतोच. साधनेची प्रगती म्हणून जे काही मानदंड आपण ठरविले असतील तेसुध्दा आपल्या कल्पनेचेच फळ आहे. वास्तवात आपल्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही तरी आपली प्रगती झाली नाही असे आपण म्हणू शकत नाही. स्वतःकडे अपेक्षेविरहित नजरेने बघायची क्षमता फार थोड्या भाग्यवान लोकांमध्ये असते. अशा महामानवांनी आपली सर्व साधना जणू पूर्वजन्मींमध्येच संपूर्ण केलेली असते आणि या जन्मात ते फक्‍त राहीलेली बाकी चुकती करण्याकरीता आलेले असतात वा भगवंताच्या आज्ञेने समाजोध्दारासाठी अवतरलेले असतात.

परंतु आदीशंकराचार्य, श्री रामकृष्ण परमहंस, श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखी थोर मानवांखेरीज आपणा सर्वांना स्वतःच्या कल्पनेला तोंड द्यावे लागतेच. म्हणून अत्यंत दुर्मिळ जन ‘जय जय स्वसंवेद्या’ या मार्गावर चालण्यास पात्र असतात. बाकी सर्वांना हळूहळू आपली श्रध्दा दृढ करीत आणि दोन पावले पुढे तर दीड पावले मागे अशा गतीने साधना करावी लागते. त्यामुळे स्वतःचे आत्मरुप जाणून घ्यायचे आहे हे कळले तरी लगेच आपण ते जाणून घ्यायच्या मार्गावर चालण्याच्या पात्रतेचे होत नाही. पूर्वतयारी करुन, स्वतःमध्ये अध्यात्मिक बळ आणून मगच आपण परमार्थाच्या उच्च मार्गावर जाऊ शकतो.

आत्मरुपाला जाणून घेण्याला आपण योग्य आहोत की नाही हे बघण्यास एक अत्यंत सोपी चाचणी अशी आहे: जर आपणास आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधीतरी आत्यंतिक दुःख वा आत्यंतिक सुख झाले असेल तर आपणात योग्यता नाही. कुठल्या कारणाने सुख वा दुःख झाले ते महत्वाचे नाही. सुख वा दुःख झाले असेल तर आपणात कुठलीतरी एक वासना प्रबळ होती असे मानायला पाहिजे (कारण अपेक्षेविना ना सुख आहे ना दुःख) आणि एकदा वासनेचा मनात प्रवेश झाला की आपणात त्रुटी निर्माण झाली. ती कधी आपला घात करेल हे सांगता येत नाही.

आपणा सर्वांना अतिशय सुख आणि दुःख दोन्ही भोगावे लागले असल्याने आपण सर्व आत्मरुपाला जाणण्यासाठी सांख्ययोगाचा उपाय करु शकत नाही. आपणास कर्मयोगच बरा. ज्याप्रमाणे अर्जुनाला युध्द करुनच मोक्ष मिळाला त्याप्रमाणे आपल्याला जीवनाला तोंड देऊनच परमार्थ करावा लागणार आहे. स्वतःच्या इच्छा-आकांक्षांवर जर अंकुश लावायचा असेल तर आपणास अशा स्थितीचे दर्शन होणे आवश्यक आहे की ज्याचा आपण आदर्श ठेवू शकतो.

भगवान श्रीकृष्णांनी आपल्यासमोर आलेली सर्व कर्मे यथोचित पार पाडून अवतारसमाप्ती केली हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या कर्मापासून अलिप्त असण्याचा निर्वाळा आपण देऊ शकलो तर आपल्या मनात स्वतःचे जीवन कसे जगावे याबद्दल एक नवीन साचा तयार होईल. असा साचा की जो स्वतःच्या कल्पनेवर आधारीत नसून वस्तुस्थितीवर आधारित आहे. त्यानुसार वर्तन करण्याचे धैर्य जर आपल्यात असेल तर मग आपले स्वतःचे अस्तित्वही एका अंगाने भगवंतांसारखेच निर्लेप, निर्मोही आणि अविनाशी आहे असे दिसेल आणि मग आपल्या वासना एका वेगळ्याच स्तरावर आहेत आणि आपण दुसऱ्या स्तरावर आहोत हे गोचर होईल. आत्मरुप जाणून घेण्यास आपण पात्र होऊ.

तेव्हा सांगायचे म्हणजे असे की स्वतःबद्दल निरपेक्ष विचार करता येत नसेल तर भगवंताबद्दल निरपेक्ष विचार करा. एकदा मनाला दुसऱ्या कोणाकडे वासनारहित बघण्याची सवय झाली की आपली नजर स्वच्छ होईल व स्वतःकडेही कुठलाही पूर्वग्रहरुपी चष्मा न घालता आपण बघू शकू. खुद्द जनक राजादेखील काही वर्षे एकांतात राहून ज्ञान प्राप्त करुन आला आणि मग राज्य चालवित असतानाच सहज अवस्थेत आयुष्य जगत होता असे दिसून येते. त्याचप्रमाणे कर्मयोगाच्या मार्गावर पदार्पण करण्याआधी आपण भगवंताबद्दल स्नेह, भगवंताच्या खऱ्या रुपाची ओळख करुन घेतली पाहिजे. मग आपण जे काही करु तो सर्व कर्मयोगच होईल.

॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.

ॐ ओम नमो पांडुरंगनाथायन नमः ॐ ओम नमो पांडुरंग देवताभ्युनमः
ॐ ओम कैवल्यपतये विद्मही चिन्मयानंदाय धीमहि तन्नो पांडुरंग प्रचोदयात
ॐ परमहंस ॐ अनंतकोटि ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्हचैतन्य सद्गुरू श्री सत्चिदानंद पांडुरंगनाथ सुतार महाराज. ॐ