तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.१५२७

(मोह माणसाचा घात करतो, हे प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -)

आपुल्याचा भोत चाटी ।

मारी करंटी पारीख्या ।।१।।

ऐसे जन भुलले देवा ।

मिथ्या हेवा वाढवी ।।२।।

गळा गिळी आमिषे मासा ।

प्राण आशा घेतला ।।३।।

तुका म्हणे बोकड मोहो ।

धरी पहा हो खाटिकाचा ।।४।।

अर्थ –
ज्या म्हशीचे पारडू मेले आहे, तिच्या पारडाची कातडी काढून त्यात भुसा भरून तयार केलेले भोत त्या म्हशीसमोर ठेवले तर ती म्हैस त्या भोताला आपले खरे पारडू समजून चाटू लागते; परंतु दुसऱ्या म्हशीचे पारडू येऊन तिचे दूध पिऊ लागले तर त्या दुसऱ्या वासराला ती मारते. ।।१।।
देवा ! अशा प्रकारे लोक सुद्धा आपले – परके अशा मोहात पडून भुलून गेले आहेत. (ते एखाद्या माणसाची चूक केवळ तो आपला आहे म्हणून झाकतात व दुसऱ्याची बारीकशी चूक तो केवळ परका आहे म्हणून उघडी पाडतात.) ।।२।।
गळाला लावलेल्या अन्नाच्या तुकड्याचा मोह धरून मासा तो गळ गिळतो व घात करून घेतो. आशा ही माणसाचा अशाच रितीने घात करणारी असते; जी मोहातून जन्म घेते. ।।३।।
तुकोबा म्हणतात, पहा ! हिरव्या गवताचा मोह धरून बोकड सुद्धा खाटकाच्या मागे मागे जातो. (त्याप्रमाणे आपल्या परक्याच्या मोहात पडून माणसे स्वतःचा घात ओढवून घेत असतात.) ।।४।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!