तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२५३१

(दंडनितीबद्दल प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -)

दंड अन्यायाचे माथा ।

देखोनि करावा सर्वथा ।।१।।

नये उगें बहुता घाटू ।

सोने शिसीयांत आटू ।।२।।

पापपुण्यासाठी ।

नीत केली आता खोटी ।।३।।

तुका म्हणे देवा ।

दोष कोणाचा तो दावा ।।४।।

अर्थ –
देवाला उद्देशून तुकोबा म्हणतात, जो अन्यायी असतो, नेमके त्यालाच शोधून दंडीत केले पाहिजे. ।।१।।
एखाद्याला शिक्षा करण्यासाठी इतर निरापराध्यांना विनाकारण त्रास देऊ नये. उगीचच शिशामध्ये सोने आटवून काय फायदा आहे ? ।।२।।
देवा ! तुम्ही पाप आणि पुण्य यांचा निवाडा करण्यासाठी जे नियम सांगितले होते, त्याला आता तुम्हीच खोटे का ठरवता आहात ? ।।३।।
तुकोबा म्हणतात, देवा ! नेमका दोष कोणाचा आहे हे तरी आपण सांगा. ।।४।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!