तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.४

(स्वतःचे खरे हित ज्याला कळते, अशा मनुष्याची स्तुती तुकोबा ह्या अभंगातून करतात. -)

आपुलिया हिता जो असे जागता ।

धन्य मातापिता तयाचिया ।।१।।

कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक ।

तयाचा हरीख वाटे देवा ।।२।।

गीता भागवत करिती श्रवण ।

अखंड चिंतन विठोबाचे ।।३।।

तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ।

तरी माझ्या दैवा पार नाही ।।४।।

अर्थ –
स्वतःच्या हितासाठी जो नेहमी जागा असतो, त्याला जन्म देणारे आईवडील खरोखरच धन्य असतात. ।।१।।
ज्या कुळामध्ये सात्विक असे कन्या व पुत्र जन्माला येतात, त्या कुळाचा आणि त्या कन्यापुत्रांचा मला खरोखरच आनंद वाटतो. ।।२।।
जे सतत गीता आणि भागवत यांचे वाचन, श्रवण व मनन करतात, तसेच पांडूरंगाचे चिंतन करतात. ।।३।।
अशा हरीभक्तांच्या सेवेची मला संधी प्राप्त झाली तर माझ्या ते माझे परम भाग्य असेल, असे तुकोबा म्हणतात. ।।४।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!